तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर अर्णब गोस्वामींचं उद्धव ठाकरेंना आव्हान
वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन मंजूर केला.
अर्णब गोस्वामी यांच्यासहित इतर दोन आरोपींनाही जामीन देण्यात आला. न्यायालयानं प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. सुटका झाल्यानंतर अर्णब गोस्वामी हे आपल्या न्यूज रूममध्येही पोहोचले. यावेळी पुन्हा त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं. “उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला आहे,” असंही ते यावेळी म्हणाले.
“उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ तर आता सुरू झाला आहे,” असंही अर्णब गोस्वामी यावेळी म्हणाले. तसंच आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
तसंच आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही आपली उपस्थिती असल्याचं ते म्हणाले. “मी तुरूंगाच्या आतूनही वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही,” असंही त्यांनी आक्रमक होत म्हटलं. तसंच अंतरिम जामीन दिल्याप्रकरणी गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभारही मानले.
दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन दिल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. तसंच महाविकास आघाडी सरकाला त्यांची जागा दाखवून दिल्याचंही म्हटलं. दरम्यान, सरकारनं राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्णय केल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या न्यायपीठापुढे अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवरील सुनावणी पार पडली. अर्णब गोस्वामी यांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाकडून चूक झाल्याचं सर्वोच्च न्यायालयानं यावेळी म्हटलं. वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारताना उच्च न्यायालयाने योग्य कारवाई केली नसल्याचही मत यावेळी न्यायलयानं नोंदवलं.

Comments
Post a Comment