ओमनीच्या धडकेत ६ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू.... उजगाव बडदवाडीतील घटना
देवरुख : प्रतिनिधी
संगमेश्वर तालुक्यातील उजगाव बडदवाडी येथे ओमनी कारने धडक दिल्याने ६ वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अंश अंकुश कानसरे (वय- ६ रा. उजगाव बडदवाडी ) असे मयत झालेल्या बालकाचे नाव आहे. प्रवीण प्रभाकर पवार (३०, उजगाव पवारवाडी) असे आरोपीचे नाव असून त्याला देवरूख पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण हा आपल्या ताब्यातील ओमनी कार घेवून उजगाव पवारवाडी ते बडदवाडी असा भरधाव वेगाने प्रवास करीत होता. याचवेळी बडदवाडी येथे ओमनी आली असता अंश कानसरे या बालकाला ओमनीची जोरदार धडक बसली. या अपघातात अंश याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला तत्काळ अधिक उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषीत केले.
दरम्यान, या अपघाताची खबर सुषमा सुरेंद्र कानसरे यांनी देवरूख पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व अपघातास कारणीभूत असलेल्या प्रवीण पवार याला अटक केली. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बाईंग करीत आहेत. अंश कानसरे या सहावर्षीय बालकाचा ओमनी कारच्या धडकेत दुर्देवीरित्या मृत्यू ओढवल्याने कानसरे कुटुंबासह संपुर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

Comments
Post a Comment