मध्यप्रदेश, राजस्थान पाठोपाठ आता महाराष्ट्रातही फटाके विक्रीवर बंदी ?
युरोपातील काही देशात पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यासोबतच भारतातही पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने तयारी देखील सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
यासोबतच फटाकेमुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री आणि कॅबिनेटमध्येही मी याबाबत आग्रह धरणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास यावर्षी फटाक्यांवर बंदी असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, फटाक्यांच्या धुरात टॉक्झिसिटी खूप असते. थंडीमुळे तो धूर वर जाऊ शकणार नाही. त्यामुळे श्वसनाला अधिक बाधा निर्माण होऊ शकते. यासंदर्भात अधिक काळजी घेतलेली बरी आहे, यासाठीच दिवाळीपूर्वीपर्यंत हा नियम लागू करण्याचा माझा आग्रह राहील. मृत्युदर कमी करण्यासाठीही महत्त्वाचे निर्णय घेतले.
त्यासोबतच यावेळी कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नागरिकांना केले. दरम्यान, यापूर्वी मध्यप्रदेश, ओडिशा आणि राजस्थान सरकारने दिवाळीपूर्वीच फटाका विक्रीवर बंदी घातली आहे.

Comments
Post a Comment