के.सी.जैन नगर लगतचे पारंपारिक गटार बुजविणा-या ठेकेदाराला मज्जाव करण्याची समविचारीची मागणी
रत्नागिरीः शहरातील मध्यवर्ती असलेल्या के.सी.जैन नगर लगतच्या बाजूला नव्याने निवासी आणि व्यापारी संकुलनाचे काम सुरु आहे.या कामाच्या विकासकाने मनमानीचा अवलंब करुन बाजूला असणाऱ्या विस्तीर्ण गटारात माती टाकून परंपरागत सांडपाणी वाहणाऱ्या या गटाराचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न चालविला आहे तेव्हा या ठेकेदारावर तातडीने कारवाई करुन या बांधकामाची त्वरित चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने जिल्हाधिकारींसह अन्य सबंधितांकडे केली आहे.
अधिक वृत्तानुसार,के.सी. जैन नगर लगत पुर्वापार वहाळ आहे.या वहाळात भारत बँग फँक्टरी पासूनचे सांडपाणी वहात असते.यामध्ये वैद्यकीय वापरातील सांडपाणी खाद्य उद्योग आणि गृहनिर्माण संस्थांची घाण ओसवाल नगर लगतच्या वहाळाला मिळते.हे गटार बंदिस्त करावे म्हणून येथील स्थानिक वर्षानुवर्षे मागणी करीत आहेत.ती जुमानली गेली नाही.अनेकांनी हे गटार बंदिस्त करु सांगून मते घेतली.हे सारे असतानाच आता हा ठेकेदार खोदलेली माती बिनदिक्कतपणे या उघड्या गटारात टाकून मनमानी करीत आहे.असेच चालू राहीले तर वाहून येणारे मैलायुक्त पाणी रस्त्यावर पसरुन या भागातील स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यताही या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
आजूबाजूच्या नागरी वस्तीच्या आरोग्याचा विचार करुन या प्रकाराला पायबंद घालावा,या कामासाठी दिलेली परवानगी,वापर याची पडताळणी करावी अन्यथा सदर ठेकेदार,नगर पालिका अभियंता यासह इतर जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नाईलाजाने अवलंबवावी लागेल असा इशारा समविचारीचे बाबासाहेब ढोल्ये,राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,युवा प्रमुख निलेश आखाडे,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,आदींनी या निवेदनाधारे दिला आहे.
दरम्यान या परिसरातील नागरिकांनी समविचारीला पाठिंबा दिला असून तीव्र आंदोलन करण्याची मागणी केली आहे.
Comments
Post a Comment