चिपळुणातील रामदास सावंत खूनप्रकरण, पाेलीस अधिकारी सुरज गुरव यांना 'बेस्ट डिटेक्शन' रिवाॅर्ड
चिपळूण नगरपालिकेचे माजी प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांच्या खून प्रकरणाचा तपास जलद लावल्याने तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीस महासंचालक यांचे 'बेस्ट डिटेक्शन' रिवाॅर्ड देण्यात आले.
येथील नगर परिषदेचे निवृत्त प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांचा १ जानेवारी रोजी खून करण्यात आला होता. २ जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्याच घराजवळील शेतात आढळून आला. मात्र, या खून प्रकरणाचा तपास पोलिसांसाठी डोकेदुखी बनला होता. पोलिसांची चार पथके सलग दोन महिने अहोरात्र या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र, यश येत नव्हते. साहजिकच चिपळूण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
त्यानंतर उपविभागीय अधिकारी म्हणून सुरज गुरव यांनी पदभार स्वीकारताच हे आव्हान स्वीकारले आणि पुन्हा तपासला सुरुवात केली होती. पोलीस निरीक्षक देवेन्द्र पोळ, शिरीष सासणे, उपनिरीक्षक शरद कुवेस्कर, सचिन दाभाडे, पोलीस कर्मचारी योगेश नार्वेकर, पंकज पडलेकर, मनोज कुळे, इम्रान शेख, गणेश पटेकर, विजय आंबेकर, रमीज शेख, मिलिंद चव्हाण, सुनील गुरव, संदीप नाईक यांच्या टीमने या प्रकणाच्या तपासात सतत काम करत होती.
सुरज गुरव तसेच पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शन या टीमला मिळाले आणि अखेर यश आले. शहरानजीकच्या खेर्डी येथे राहणार आकाशकुमार नायर (२३) याला या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आणि संपूर्ण खून प्रकरणाचा उलगडा झाला.
तसेच आरोपी नायर याने खुनाची कबुली देखील दिली. पोलिसांनी बजावलेल्या या कामगिरीची दखल घेत विशेष पोलीस महासंचालक नवल बजाज यांनी या टीमला रोख ४३ हजार इतके बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर आता सुरज गुरव यांच्यासोबत त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन दाभाडे, योगेश नार्वेकर, पंकज पडेलकर यांना ही पोलीस महासंचालक यांचे बेस्ट डिटेक्शन रिवाॅर्ड देण्यात आले आहे.

Comments
Post a Comment