चिपळूण मधून डेमू रेल्वे सुरू करण्याची मागणी



चिपळूण ते वसई या मार्गावर कोकण रेल्वेने डेमू रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी वसई-सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत, पालघरचे खासदार राजेंद्र गावीत यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींना निवेदनाद्वारे केली. 

यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक, सचिव यशवंत जडयार, खजिनदार शेखर बागवे, उपखजिनदार बॉबी डिसोजा, कार्यकारिणी सदस्य प्रभाकर चिबडे, बाळ वेळकर, रमेश शिगवण, सचिन जोशी उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. 

दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, पालघर जिल्ह्यातील वसई, नायगाव, नालासोपारा, विरार ते डहाणूपर्यंत कोकणातील सिंधुदुर्ग,रत्नागिरी आणि रायगडमधील चाकरमान्यांची लोकवस्ती ही साधारण दहा लाखाच्या घरात आहे. भविष्यात ते प्रमाण वाढतही जाईल. मात्र या विभागातील लोकांना कोकण रेल्वेने कोकणात जायचे झाले, तर लोकलच्या गर्दीतून दादर किंवा सीएसएमटी स्टेशनला जावे लागते. 

त्रास सहन करावा लागतो. कोकण रेल्वे मार्गावर उत्तरेतून दक्षिणेकडे जाणाऱ्या अनेक जलद रेल्वेगाड्या आहेत. मात्र त्याचा चाकरमान्यांना फायदा होत नाही. त्यामुळे वसई ते सावंतवाडी मार्गावर पॅसेंजर आणि वसई ते चिपळूण मार्गावर डेमू गाडी सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Comments