मच्छिमार सापडले आर्थिक संकटात
सततच्या वातावरणातील बदलामुळे मासे मिळण्याचे प्रमाण अत्यल्प झाल्याने मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. मासेमारी हा कोकणातील मुख्य व्यवसाय असून, रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ७,५०० कुटुंब ही मासेमारी या व्यवसायावर अवलंबून आहेत.
या व्यवसायातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी पावसाळ्यानंतर गेल्या तीन महिन्यात ही उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे मच्छीमार कुटुंबियांची आर्थिक घडी विस्कटली आहे. गेल्या मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा झाली आणि त्यावर अवलंबून असणारे मच्छिमारांच्या हजारो हातांवर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली.
किनारट्टीवरील संपूर्ण उलाढाल ठप्प झाली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यापासून पारंपारिक मासेमारी पाठोपाठ पर्ससीननेट मासेमारीही सुरु होती. मात्र, मासे मिळेनात अशी परिस्थिती निर्माण झाली. शिवाय खलाशांचाही प्रश्न अजूनही सतावत आहे.
मासेमारी सुरु झाल्यानंतर एकापाठोपाठ एक वादळे निर्माण झाल्याने बहुतांश मासेमारी नौका किनाऱ्यावर नांगरुन ठेवण्यात आल्या आहेत. तसेच खोल समुद्रात जाऊनही मासे अत्यल्प प्रमाणात मिळत असल्याने ज्या नौका समुद्रात जातात त्यांच्या खलाशांचा खर्चही भागत नाही.
मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम माशांच्या निर्यातीवरही झाला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारा मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास मच्छिमारांसमोर मोठे अर्थिक संकट निर्माण होणार आहे
कर्जाचे ओझे
डिझेलचा खर्च, बर्प, खलाशांचा पगार व भत्ता, जाळी व इंजिन दुरुस्ती आदिंवर दररोज होणारा हजारो रुपये खर्च आणि मासळी विकून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न याचा ताळेबंदच जुळत नसल्याचे मच्छिमार हैराण झाले आहेत. बँकेचे कर्ज, व्याज तसेच व्यापाऱ्यांकडून ॲडव्हान्स रक्कमेची परतपेड होत नसल्याने मच्छिमारांची आर्थिक घडी विस्कटली आहे.

Comments
Post a Comment