कुमार शेट्ये याना उशिरा का होईना जाग आली
आम्हाला वाटत होतं विरोधी पक्ष नाहीच की काय पण दैनिक फ्रेश न्युज च्या भूमिकेला आता पेपरला बातम्या तरी झळकू लागल्या आहेत.
शेट्ये साहेब थोडं तुम्हालाही आक्रमक व्हावं लागेल कारण तुम्ही सुद्धा सत्तेचे भागीदार आहेत
रत्नागिरी शहरात, महामार्गाच्या जागेत बेकायदा बांधकामांना उत, संबंधित विभागाचे दुर्लक्ष का?
बेकायदा बांधकामे तत्काळ हटवा अन्यथा आंदोलन
राष्ट्रवादीचे कुमार शेट्ये यांचा प्रशासनाला इशारा
रत्नागिरी: रत्नागिरी शहर आणि परिसरात अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रत्नागिरी शहराबरोबरच आजूबाजूच्या परिसरात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. मिऱ्या- रत्नागिरी-कोल्हापूर ते नागपूर महामार्गाच्या जागेवर साळवी स्टॉप ते हातखंबा पर्यंत अनेक ठिकाणी पक्क्या स्वरूपाची अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. याबाबत कोणत्याही खात्याकडून अद्यापपर्यंत कारवाई झालेली नाही. त्यामुळे अशा बांधकामांना कोणाचा वरदहस्त आहे का, अशी चर्चा आता सुरू आहे. या अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
गेल्या महिनाभराच्या काळापासून महामार्गावरील साळवी स्टॉप, जे के फाईल्स, टीआरपी ते कुवरबाव आणि पुढे हातखंबापर्यंत महामार्ग चौपादरिकरणासाठी भूमी संपादन प्रक्रिया सुरू असलेल्या महामार्गाच्या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात पक्क्या स्वरूपाची बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी जागा अडवून ठेवण्याचे, पक्के कट्टे उभारण्याचे काम सुरू आहे. दिवसाढवळ्या राजरोसपणे हे काम सुरू असताना याकडे संबंधित खात्याचे अद्यापही लक्ष गेलेले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये यांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे लक्ष वेधले असून अनधिकृत बांधकाम, अतिक्रमणेे हटविण्याची मागणी केली आहे.
याबाबत कुमार शेट्ये यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की रत्नागिरी शहरात खोके आणि अन्य अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेली आहे आणि याला राजकीय वरदहस्त आहे. तसेच शहराच्या जवळ लागूनच असलेल्या साळवी स्टॉप पासून महामार्गाच्या पुढील भागात दोन्ही बाजूने दगडी पक्क्या स्वरूपाची बेकायदा बांधकामे सुरू आहेत. हे सर्व राजरोसपणे सुरू असून त्यावर कोणत्याही खात्याकडून कारवाई केली जात नाही याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी प्रशासन स्तरावर तातडीने कारवाई केली गेली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही कुमार शेट्ये यांनी दिला आहे. अनाधिकृत बांधकामे आणि अनधिकृत खोके, टपऱ्या रत्नागिरी शहरात विविध भागात असून साळवी स्टॉप पासून पुढे हातखंबा पर्यंत नाचणे, मिरजोळे, खेडशी तसेच अन्य ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये या जागा आहेत आणि त्यातील अतिक्रमणे, बेकायदा बांधकामांवर कोणाचेही लक्ष कसे काय गेले नाही, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
भरपाई मिळविण्यासाठी?
मिऱ्या नागपूर महामार्ग चौपादरीकरणासाठी जमीन संपादन प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामध्ये येणाऱ्या मालमत्ता, प्रॉपर्टी, घरे, बागायातीं च्या नुकसानीचे पंचनामे करून मूल्यांकन करण्यात आले आहे. असे असताना आता महामार्गाच्या मोकळ्या जागेत होत असलेली पक्की बांधकामे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत, असा सवाल निर्माण झाला आहे. नुकसान भरपाई पदरात पाडून घेण्यासाठी च हे प्रकार सुरू असल्याची चर्चाही सुरू आहे.
खोक्यांमुळे शहराला बकालपणा?
रत्नागिरी शहरात गेल्या वर्षभराच्या काळात सेकडो बेकायदा खोके उभे राहिले आहेत. त्यामागे अनेक पुढारी असल्याची चर्चा होत आहे. नगर परिषदेने कारवाई सुरू केली की त्यात हे पुढारी अडथळे आणतात असेही सातत्याने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अतिक्रमणे हटविण्याचा व त्यामध्ये कोणीही दबाव आणणार नाही असा ठराव करण्याची कल्पना मांडली गेली होती. तसा ठराव काही होऊ शकलेला नाही. त्यामुळे खोके वाढतच असून शहराचा बकालपणा वाढत आहे. आता या अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची मागणी केली जात आहे.

Comments
Post a Comment