घातक रसायन नाल्यात फेकणाऱ्या दोन टँकर चालकांना जागृत युवकांनी रंगेहात पकडले. घातक रसायन हे लोटे औद्योगिक वसाहतीतील योजना इंडस्ट्रिज आणि वनविड केमिकल्सचे

 घातक रसायन नाल्यात फेकणाऱ्या दोन टँकर चालकांना जागृत युवकांनी रंगेहात पकडले. घातक रसायन हे लोटे औद्योगिक वसाहतीतील योजना इंडस्ट्रिज आणि वनविड केमिकल्सचे

खेड : लोटे औद्योगिक वसाहतीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या असगणी फाटा येथील रस्त्यालगतच्या नाल्यात घातक रसायन सोडताना असगणी आणि घाणेखुंट येथील काही जागृत युवकांनी दोन टैंकर चालकांना रंगे हात पकडल्याने महामार्गालगतच्या नाल्यांमध्ये घातक रसायन फेकून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचे पाप करणारे कारखाने कोणते आहेत याचा छडा लागला आहे. आता संबधित यंत्रणा या पापात सहभागी असणाऱ्यांवर कोणती कारवाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोटे औद्योगिक वसाहत ते कशेडी घाट या दरम्यानच्या नाल्यांमध्ये घातक रसायन ओतण्याचे प्रकार वारंवार घडत आले आहेत. बोरज आणि कशेडी येथील नाल्यात रसायन फेकणाऱ्या अज्ञाताच्या विरोधात खेड पोलिसात गुन्हेही दाखल आहेत. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडेही अनेकदा तक्रारी झाल्या आहेत. मात्र गुन्हेगार सापडत नसल्याचे सांगत साऱ्याच शासकिय यंत्रणा आतापर्यंत हात वर करत आल्या आहेत. १२ नोव्हेंबर रोजी असगणी येथील काही युवकांना असगणी फाट्यानजीकच्या नाल्यामध्ये घातक रसायन फेकल्याचे निदर्शनास आले होते. घटनेचे गांभिर्य ओळखून त्या युवकांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण केले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी नाल्यातील पाण्याचे नमुने घेऊन ते नमुने लोटे औद्योगिक वसाहतीतील कोणत्या रासायनिक कारखान्याच्या सांडपाण्याशी जुळणारे आहेत हे तपासणीसाठी नेले होते. 

दोन दिवसांनी जेव्हा या युवकांनी संबंधित अधिकाऱ्यांना नमुने तपासणीच्या अहवालाबाबत विचारले तेव्हा या अधिकाऱ्यांनी नाल्यातील नाल्यातील सांडपाण्याचे नमुने लोटे औद्योगिक वसाहतीतील कोणत्याच रासायनिक कारखान्याच्या सांडपाण्याशी जुळत नसल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांचे हे उत्तर युवकांना न पटल्याने त्यांनी त्या दिवसापासून लोटे औद्योगिक वसाहत परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर रात्री पाळत ठेवली होती. २३ नोव्हेंबर रोजी असगणी आणि घाणेखुंट येथील काही युवक रात्री गस्त घालत असताना पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास असगणी फाट्यानजीक दोन टँकर थांबले. काही वेळातच या दोन्ही टँकर चालकांनी नाल्यात घातक रसायन सोडण्यास सुरवात केली.

पाळतीवर असलेल्या युवकांनी या दोन्ही चालकांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र बिल्लंदर चालकांनी त्या युवकांच्या अंगावर टँकर घालण्याचा प्रयत्न करत तेथून पलायन केले. जिद्दीला पेटलेल्या त्या युवकांनी आपल्या वाहनांनी त्यांचा पाठलाग करत दोन्ही टँकर असगणी फाट्यापासून सुमारे एक ते दीड किलोमिटर वर असलेल्या लवेल येथे पकडले. टँकरमध्ये भरून आणलेले सांडपाणी हे कोणत्या कंपनीतून आणले याबाबत टँकर चालकांकडे चौकशी केली असता सुरवातीला त्यांनी उत्तर द्यायचे टाळले मात्र संतप्त झालेल्या नागरिकांचा रुद्रावतार पाहिल्यानंतर हे सांडपाणी लोटे औद्योगिक वसाहतीतील योजना इंडस्ट्रिज आणि वनविड या दोन रासायनिक कारखान्यातून भरून आणल्याचे कबुल केले. 

१२ नोव्हेंचर पहिल्यांदा हा प्रकार घडल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नाल्यातील रसायन मिश्रीत पाण्याचे नमुने घेऊन तपासणी केली होती. त्यावेळी त्यांनी नाल्यात ओतलेले रसायन लोटे औद्योगिक वसाहतीतील कोणत्याही रासायनिक कारखान्यातील सांडपाण्याशी जुळणारे नसल्याचे सांगितले होते. मात्र आता नाल्यात रसायन फेकणाऱ्या टँकर चालकांनी नाल्यात फेकलेले रसायन लोटे औद्योगिक वसाहतीतील योजना आणि वनविड या रासायनिक कारखान्यांतील असल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या   अधिकाऱ्यांनी सुरवातीला नाल्यातील पाण्याचे नमुने लोटे येथील कोणत्याच कारखान्यातील सांडपाण्याशी जुळत नाहीत असे खोटे का सांगितले याचा शोध घेणे गरजेचे आहे. 

दरम्यान खेड पोलिसांनी या दोन्ही टँकर चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असा त्यांना अटक केली आहे. कंपन्यांची नावे समजल्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही आता कारवाई करायला सुरवात केली असून लवकरच त्या दोन्ही कंपन्यांना क्लोजरची नोटीस पाठवली जाणार

असल्याचे समजते.



Comments