समाजाचे काही देणे लागतो, ही भावना लक्षात घेता फिनोलेक्स व मुकुल माधव संस्था करीत असेलेल काम महत्वपूर्ण – पालकमंत्री अनिल परब


कोरोनाच्या जागतिक संकटाशी सर्व जग लढत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो, ही भावना लक्षात घेता अनेक व्यक्ती, संस्था आपापल्या परीने आपला खारीचा वाटा उचलत असून यात फिनोलेक्स व मुकुल माधव संस्थेचा सहभाग महत्वपूर्ण आहे, असे परिवहन मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री अनिल परब  यांनी यावेळी सांगितले. 

फिनोलेक्स व मुकुल माधव संस्थेच्या माध्यमातून ‘गिव्ह विथ डिगनिटी’ उपक्रमाच्या माध्यमातून आज समाजातील विविध घटकांना मदतीचा हात देण्यासाठी आज फिनोलेक्स हाउसिंग सोसायटी येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, नगराध्यक्ष बंड्या साळवी, बांधकाम सभापती महेश म्हाप, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग , संजय मठ व संबंधित उपस्थित होते.

श्री परब म्हणाले,  शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक, विद्यार्थी, रिक्षाचालक, मच्छीमार कामगार व जनसामान्यांना फिनोलेक्स व मुकुल माधव संस्था कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदतीचा हात देत आहे, ही बाब सर्वांसाठी आदर्श आहे. दिवाळी सणाचे औचित्य साधत केली जाणारी ही मदत नक्कीच असंख्य कुटुंबांची दिवाळी प्रकाशमय बनवणार आहे. 

स्थानिकांना आपल्या कंपनीमध्ये प्राधान्याने नौकरी देण्याचे फिनोलेक्सचे सूत्र सर्वांनी स्वीकारले पाहिजे. फिनोलेक्स व मुकुल माधव संस्थेच्या सामाजिक उपक्रमांसाठी शासन स्तरावर लागणारी सर्व मदत केली जाईल, असेही श्री. परब यावेळी म्हणाले.      

श्री. सामंत म्हणाले, सामाजिक बांधीलकी जपत मदत करण्याची फिनोलेक्स व मुकुल माधव संस्थेची भावना सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. देशातील २४ राज्यातील ७० हजार कुटुंबांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते मदत करीत आहेत. ही बाब निश्चितपणे सर्व संस्थांसाठी आदर्शवत अशी आहे. 

व्यवसाय करीत असताना कायम मूल्य आणि समाजाचे देणे देण्याची समाजशील भावना जपणारी कंपनी आपल्या भागात आहे, याचा आम्हा कोकणवासियांना अभिमान आहे. कोरोनारूपी संकटाशी दोन हात करीत असताना या दोन्ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक आणि कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देत  आहेत, असेही श्री. सामंत यावेळी म्हणाले. 

श्री. सामंत म्हणाले, ‘गिव्ह विथ डिगनिटी’ या महत्वपूर्ण उपक्रमामुळे समाजातील सर्व घटकांना विशेषतः वंचित घटकाची दिवाळी आनंददायी व प्रकाशमय होणार आहे. ही मदत आपल्या हातून होत आहे याचा मनस्वी आनंद असून त्यांचे कार्य हे कौतुकास्पद आहे. रितू छाब्रिया आणि प्रकाश छाब्रिया हे मुकुल माधव व फिनोलेक्सच्या माध्यमातून करीत असलेले कार्य आदर्शवत असे आहे.




Comments