पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला जो बायडेन यांना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी यावेळी अमेरिकेसोबत असणाऱ्या धोरणात्मक भागीदारीचा पुनरुच्चारही केला. तसंच ही भागीदारी अजून मजबूत करण्यासंबंधी चर्चा केली.
मंगळवारी रात्री उशिरा ट्विट करत नरेंद्र मोदींनी जो बायडेन यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचंही अभिनंदन केलं. कमला हॅरिस यांचा विजय भारतीय-अमेरिकन समुदायासाठी अभिमानाची बाब असल्याचं ते म्हणाले आहेत.
नरेंद्र मोदींनी ट्विट करत म्हटलं आहे की, “अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना फोन करुन अभिनंदन केलं. भारत आणि अमेरिकेतील धोरणात्मक भागीदारीसंबंधी आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. याशिवाय आम्ही करोना महामारी, हवामान बदल, इंडो-पॅसिफिक भागात सहकार्य अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली”.
याआधी मंगळवारी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी जो बायडेन यांच्या नेतृत्वात अमेरिकेसोबत सकारात्मक संबंध निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला. दहशतवाद, हवामान बदल आणि करोनाविरोधातील लढ्यात भारत एकत्रितपणे काम करण्याची शक्यता आहे. याशिवाय जो बायडेन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या कायमस्वरुपी जागा देण्याच्या दाव्याचं समर्थन करण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव
३ नोव्हेंबरला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी ३०६ मतांसोबत विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी आणि रिपब्लिकनचे डोनाल्ड ट्रम्प यांना फक्त २३२ मतं मिळाली.
५३८ इलेक्टोरल व्होट्समधील २७० हून अधिक ठिकाणी विजय मिळवल्यानंतर प्रसारमाध्यमांनी जो बायडेन यांना विजयी घोषित केलं. मात्र अद्यापही डोनाल्ड ट्रम्प आपला पराभव मान्य करण्यात तयार नाहीत. आपणच विजयी झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा आहे.

Comments
Post a Comment