रत्नागिरी जिल्हा संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहिम २०२०; जिल्हा समन्वय समिती स्थापन
रत्नागिरी प्रतिनिधी:-
राज्यातील कोवीड -१९ च्या आपातकालीन परिस्थितीमुळे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णाचे निदान व औषधोपचाराखाली आणण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत अत्यंत कमी झालेले आहेत . समाजातील कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण कमीत कमी कालावधीत शोधण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार दिनांक ( ०१ डिसेंबर २०२० ते १६ डिसेंबर २०२० ) या कालावधीमध्ये राज्यात ( Combined Leprosy and TB Cases detection campign 2020 - 21 ) अभियान राबवण्यात येणार आहे . केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अभियान यशस्वीपणे राबविण्याकरीता राज्यातील सर्व जिल्हयात मा . जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती स्थापन करण्यात आलेली असून सदर अभियान जिल्हा समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांनी दिनांक १२.११.२०२० व २४.११.२०२० रोजी झालेल्या सभेमध्ये संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम संयुक्तपणे राबविण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. तसेच दि .२५.११.२०२० रोजी जिल्हा आरोग्य समिती सभेमध्ये सभापती महेश उर्फ बाबू म्हाप तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस.कमलापुरकर यांनी अभियानाबाबत सविस्तर चर्चा करुन तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरीय अधिकारी व प्रतिनीधी यांना अभियान नियोजन पध्दतीने यशस्वी करण्याच्या सुचना दिल्या. या अभियानअंतर्गत जिल्हयातील ग्रामीण भागातील संपूर्ण लोकसंख्या व शहरी भागातील ३०% लोकसंख्येचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. समाजातील प्रथम अवस्थेतील विना विकृती कुष्ठरुग्ण शोधून त्वरीत उपचाराखाली आणने व कुष्ठरोगाच्या संसर्गाची साखळी खंडीत करणे हा या अभियानाचा मुख्य उदिष्ट असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील कुष्ठरोग मुक्त भारत हेतू साध्य करणे आहे . अभियाना करीता जिल्हयास्तर , तालुकास्तर , प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर नियोजनबध्द पध्दतीने पथके तयार करण्यात आलेले असून १२३० पथकांमार्फत ग्रामीण भागातील १५,६८,८ ९ ५ व शहरी भागातील ५८०२ ९ लोकसंख्येचे सर्वेक्षण करून समाजात असलेले संशयीत कुष्ठरुग्ण शोधून प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर उपचाराखाली आणण्यात येणार आहे , अशी माहिती डॉ .वसीम युसूफ सय्यद यांनी दिलेली आहे.

Comments
Post a Comment