शेतकऱ्यांंना हेक्टरी ४० हजारांची मदत द्या
तालुक्यात बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतात जाऊन तात्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने मुख्यमंत्र्यांच्या नावे कृषी अधिकारी गायकवाड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सोयाबीन पाठोपाठ कपाशीचेही पीक हातून गेले आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. प्रारंभी बोगस बियाणे, खोडकिड, बुरशीजन्य रोगाचा प्रकोप, जास्त प्रमाणात पडलेला पाऊस आणि आता बोंडअळी यामुळे शेतकरी हताश झाला आहे.
आतापर्यंत शेतीकरिता लागलेला खर्चही भरुन निघणयाची काही शक्यता नाही. आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडल्याने शेतकऱ्यांपुढे चरित्रार्थ चालविण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी विवंचनेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ हेक्टरी ४० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अन्यथा कपाशीचे झाड घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही निवेदनातून दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे यांच्या नेतृत्वात कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी सुधाकर वाढई, उपाध्यक्ष अमोल बोरकर, प्रल्हाद तुराळे, जिल्हासचिव सुनील भुते, गजू चिडे, रमेश घंगारे, राहुल सोरटे, उमेश नेवारे, जयंता कातरकर, मनोहर ढगे, गजानन भेंडे, मारोती बोरकर, गोपाल लोणकर, नागो भुते, मंगेश लोणकर, मंगेश सायंकार, विशाल झामरे, संजय जांगडे, मिथुन नखाते, सतीश बोरकर, सूर्यभान तळवेकर, नारायण खोंडे, किशोर भजभुजे, नरेश चिरकुटे, अमोल मुडे, मिथुन चव्हाण आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment