शास्त्रीपूल-डिंगणी-पिरंदवणे रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार


संगमेश्वर: दि. ३१ ऑक्टोबर रोजी प्रसृत झालेल्या वृत्ताच्या आधारे भाजपच्या खाडी भागातील पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या भावना प्रकट करण्यासाठी आज दि. ०३ नोव्हेंबर रोजी देवरुख-संगमेश्वरचे कार्यकारी उपअभियंता श्री. भारती साहेब यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले. 

श्री. भारती यांनी अत्यंत जबाबदारीने ते निवेदन स्विकारले; त्यावेळी खाडी भागातील रस्त्याच्या परिस्थितीची त्यांना जाणीव असून यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू करण्याचे तसेच येत्या आठवडाभरात कामाला प्रारंभ करण्याचे आश्वासन दिले. याच बरोबर कामाच्या गुणवत्तेत कणभरही तडजोड होऊ देणार नाही असे अभिवचन त्यांनी आवर्जून दिले.

यावर भाजप तालुकाध्यक्ष श्री. अधटराव यांनी तत्परता दाखवून रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याबद्दल जनतेच्या वतीने  भारती साहेबांचे मनःपूर्वक आभार मानले. मात्र याबरोबरच ते पुढे म्हणाले की आम्ही फक्त आश्वासन मिळवण्यासाठी हे निवेदन दिलेले नाही.

याची दिलेल्या शब्दाप्रमाणे अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास संघर्ष अटळ आहे. आम्ही जनतेशी जोडलेले आहोत, जनता आमच्यासाठी सर्वप्रथम आहे. त्यामुळे रस्त्याचे काम वेळीच सुरू झाले नाही तर आम्ही पुढील दिशा ठरवण्यास सक्षम आहोत.

याप्रसंगी भाजप संगमेश्वरचे तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद अधटराव यांच्या समवेत भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. राकेश जाधव, तालुका उपाध्यक्ष श्री. मिथुन निकम, तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताठरे, दिपक चाळके, राजेश गवंडी, मयूर निकम, जयकुमार चाळके, संजू नटे आदि पदाधिकारी व भाजप समर्थक उपस्थित होते.

Comments