कडवई येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे शिबीर संपन्न


तालुक्यातील कडवई येथे शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचे अर्ज ऑनलाइन स्वरुपात भरून देण्याचे कार्य संगमेश्वर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडले. 'आपण समाजाचे देणे लागतो' या पवित्र भावनेतून कडवई गावातील प्रतिष्ठित नागरिक, जि. प. रत्नागिरीचे माजी अध्यक्ष तसेच भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. राजनजी कापडी यांच्या व्यायामशाळेत,कडवई बाजारपेठेत हे कार्य संपन्न झाले.

भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस डॉ.अमितजी ताठरे यांच्या संकल्पनेतून 300 बांधकाम कामगारांचा मेळावा गोळवली येथील प.पु.गोळवलकर गुरुजी स्मृती ग्रामविकास प्रकल्पाच्या भव्य सभागृहात दि. २६ ऑक्टोबर रोजी घेण्यात आला होता. 

असंघटित कामगारांना नोंदणी करून संघटित करणे व अशा नोंदणीकृत असंघटित कामगारांची संघटना उभी करून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करणे असे या पूर्ण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

भारतीय जनता पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी हे देशातील तर मा. विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्रजी फडणवीस हे राज्यातील शीर्षस्थ नेते आहेत. त्यांच्या कल्याणकारी योजना तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याची आहे.

अतिशय जबाबदारीने लोकांच्या भल्याचा विचार करून शासन या योजना सुरू करत असते. त्याचा उचित लाभ घेणे ही जनतेची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही सर्व प्रकारे सहाय्य करू. आपण फक्त योजनांचा लाभ मिळण्यासाठी पुढे या, येताना आप्तेष्ट, मित्रपरिचितांना घेऊन या. त्यांनाही लाभ मिळवून द्या. असे भावनिक आवाहन जिल्हाध्यक्ष श्री. कापडी यांनी या वेळी केले.

Comments