महावितरण तंत्रज्ञास मारहाण एका विरोधात गुन्हा दाखल
तालुक्यातील साठे मोहल्ला येथे महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञानाला शिविगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी मतीन ताजुद्दीन साठे (४०, रा. बाणकोट, साठे मोहल्ला, मंडणगड) विरोधात बाणकोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याच्याविरोधात महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ मोहन रामचंद्र लोंढे (३७, सध्या रा.वेसवी, मंडणगड) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी ते आपल्या दुचाकीवरुन विद्युत पुरवठा दुरुस्ती करण्यासाठी साठे मोहल्ला येथे जात होते.
ते साठे मोहल्ला येथे आले असता तिथे काही जण मिळून रस्त्याच्या डागडुजीचे काम करत होते. तेव्हा लोंढे यांनी लाईटची तक्रार असल्याने मला जाणे गरजेचे असून तुम्ही रस्त्यावर लावलेले दगड मी स्वतःकाढून पुन्हा जागेवर ठेवतो, असे सांगितले.
तेव्हा संशयित साठेने लोंढे यांना उद्देशून वायरमन लोकांना आम्ही जाऊ देणार नाही. लाईटची बिले जास्त येतात, असे बोलून त्यांच्या कानाखाली लगावली व त्याने लोंढे यांना शिविगाळ करत त्यांचे शर्ट पकडून धक्काबक्की करत तुला गाडीसह समुद्रात फेकून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस नाईक पिठे करत आहेत.

Comments
Post a Comment