समविचारीच्या लढ्याला यशःअथर्व कंपनीच्या मालमत्ता जप्त करण्याच्या मागणीची पुर्तता


आकर्षक योजनांचे आमिष दाखवित हजारो एजंटकरवी करोडो ठेवीदारांना आर्थिक गंडा घालणाऱ्या अथर्व4यु इन्फ्रा अँड अँग्रो लि. या वित्तीय कंपनीच्या कोट्यावधीच्या मालमत्ता जप्त करण्याच्या प्रक्रियेला लवकरच सुरवात होणार असल्याने या विरोधात महाराष्ट्रात सर्वप्रथम एजंट ठेवीदार यांना एकत्र करुन लढा देणाऱ्या महाराष्ट्र समविचारी मंचच्या लढ्याला यश आले आहे.

अथर्व वित्तीय कंपनीच्या विरोधात महाराष्ट्रात समविचारीने प्रथम लढा सुरु केला.गेली तीन वर्षे हा लढा सुरु होता.याबाबत संस्था नोंदणी कार्यालय दिल्ली ते मुंबई पर्यत सतत पत्रव्यवहार करण्यात आला.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या दिल्ली मुंबई येथील कार्यालयांना कळविण्यात आले.रत्नागिरी येथील जिल्हा पोलिस यंत्रणेने याबाबतीत गुन्हे दाखल करण्याचे पत्र दिले होते.कायम निदर्शने,धरणे,उपोषण या मार्गाने कंपनी विरोधात कडवा विरोध दाखविण्यात आला.जिल्ह्यातील पत्रकांरानी याविषयी साथ दिली.

कंपनीने करोडो रुपयांच्या ठेवी घेतल्या.पण त्या ठेवी भुखंड देण्याच्या बदल्यात घेतल्या असे दाखविले.त्यामुळे जिल्हा ग्राहक मंचाकडे दाखल केलेले दावे फोल ठरले.तरीही समविचारीने केंद्र शासनाच्या गृह विभागाकडे रितसर अर्ज देऊन अथर्व कंपनीच्या सर्व संचालकांच्या वंशावळीत हडप केलेले खात्यावरील पैसे आणि स्थावर मालमत्ता जप्त कराव्यात अशी मागणी केली.काही संचालक परदेशात गेले आहेत त्यांना भारतात आणून त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली होती.

महाराष्ट्रात समविचारीने सर्वप्रथम लढा पुकारताच राज्यातील अन्य जिल्ह्यातूनही सुरु झाला.हा लढा थांबावा म्हणून कंपनीने मुठभर हस्तक असलेल्या एजंटना मुंबईत बोलवून जमिनी देतो.लवकरच सर्व पैसे देतो म्हणून मतवले.समविचारीवरही आरोप करुन हा लढा थांबावा म्हणून प्रयत्न केले.यातून एजंट वर्गाने पाठ फिरवली. समविचारीने ठेवीदार संघटनेच्या मदतीने आपला पत्रव्यवहार भेटीगाठी सुरुच ठेवल्या.

कायदेशीर कटकट नको म्हणून ठेवीदारही यावेळी स्वतःहून पुढे यायला धजावत नव्हते या परिस्थितीत दिलेल्या वचनाला जागून समविचारीने आपला लढा सुरुच ठेवला.या लढ्याला यश आले असून कंपनीच्या कोट्यावधींच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश निर्गमित झाले आहेत. या लढ्याचे नेतृत्व समविचारीचे बाबासाहेब ढोल्ये यांनी केले.तर या लढ्यात समविचारीचे जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,युवा राज्य प्रमुख निलेश आखाडे यांनी साथ दिली.

यापुढे केवळ कंपनीच्या नावावरील मालमत्ता जप्त करुन न थांबता सर्व संचालकांच्या वंशावळीला धरुन जे जे नातेवाईक वा इतर व्यक्ती असतील त्यांच्याही मालमत्ता ताब्यात घ्याव्या अशी मागणी करुन ठेवीदारांच्या ठेवी सशर्त परत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर यांनी सांगितले.या निर्णयाने जिल्ह्यातील ठेवीदारात समाधान व्यक्तविण्यात येत असून आपले पैसे परत मिळेपर्यत कंपनी आणि सबंधित यांच्या विरोधात लढा सुरुच राहील असा निर्धार व्यक्तविण्यात आला आहे.

आता लवकरच राज्य भरात ज्या अन्य कंपन्या आर्थिक गंडा घालून गेल्यात त्याही कंपन्यांविरोधात लढा सुरु करण्यात येईल असा इशारा राज्य  सरचिटणीस संजय पुनसकर यांनी दिला असून हा लढा राज्यभरात यशस्वी करण्याचा निर्धार राज्य आंदोलन नेते अरविंद पत्की,प्रदेश अध्यक्ष बापू कुलकर्णी,महिला प्रदेशाध्यक्ष दिपिका बापट,महिला राज्य सरचिटणीस अँड.वर्षाताई पाठारे,महासचिव श्रीनिवास दळवी,राज्य चिटणीस विनय माळी,मुंबई अध्यक्ष अरुण माळी,ठाणे आणि कोकण विभाग प्रमुख राजेंद्र गोसावी,कोल्हापूर अध्यक्ष राजेंद्र सुर्यवंशी आदींनी केला आहे.

Comments