चिंचखरी येथे शेतकर्यांचा गटशेतीचा प्रकल्प राबवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी अनुपस्थित
चिंचखरी येथे शेतकर्यांचा गटशेतीचा प्रकल्प राबवण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी अनुपस्थित राहिले. स्थानिक मंत्री उदय सामंतांच्या घाणेरड्या राजकारणामुळे जिल्हाधिकार्यांना मुंबईत बैठकीस थांबवून घेण्यात आले. यामुळेच रत्नागिरी जिल्हा मागे पडत आहे.
निवडणुकीच्या वेळी राजकारण करावे. पण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे. स्थानिकांचे स्थलांतर रोखण्यासाठी केंद्र सरकार व भाजपच्या वतीने प्रयत्न सुरू असताना असे राजकारण करू नये, असा टोला भाजप सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनी लगावला.
खारबंधारे, लघुपाटबंधारे प्रकल्पांकडे मंत्री सामंत दुर्लक्ष करत आहेत. शेतकरी गटांसाठी 15 दिवसांत अहवाल देण्याकरिता कृषी अधिकार्यांना सांगितले आहे. जिल्ह्यासाठी पाहुणे पालकमंत्री देण्याची प्रथा आहे. यापूर्वी वायकर हेसुद्धा असेच मंत्री होते.
कृषीसेवकांनी गावातील मातीचे परीक्षण करून कोणती शेती करावी, हे शेतकर्यांना सांगावे. याचा अहवाल जिल्हाधिकार्यांना सादर करण्याची सूचना केल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात बाहेरूनच भाजी येते, मग स्थानिकांनी काय करायचे?
स्थलांतर रोखण्यासाठी केंद्र सरकार व भाजपचे योगदान लाभण्यासाठी गटशेती व मातीपरीक्षणानुसार शेती करावी, याकरिता प्रयत्न सुरू आहे. मत्स्यसंपदा योजनेबाबतही 7 दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार प्रसाद लाड यांनी हा विषय सांगितला. ते म्हणाले, की, चिंचखरी येथे चार गट स्थापन करून 125 एकर जमीन ओलिताखाली आणण्यात येणार आहे. या शेतकर्यांसमवेत जिल्हाधिकार्यांची बैठक आज दुपारी होती.
याबाबत त्यांच्याशी मोबाईलद्वारे चर्चाही झाली. परंतु आज ते जाणीवपूर्वक उपस्थित राहिले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात कोणीही या बैठकीची तयारी केली नाही. मग नीलेश राणे यांनी उपोषणाला बसू, अशी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर उपजिल्हाधिकार्यांसोबत बैठक झाली.
शेतकरीसुद्धा बैठकीला आले होते. नाबार्ड, जिल्हा बँक, अग्रणी बँकेकडूनही या शेतकर्यांना मदत मिळत नाही. त्यासाठी आता मुंबई जिल्हा बँक 50 लाख रुपयांची मदत देणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाला की आणखी 5 कोटीची मदत देऊ. पोमेंडी खुर्द येथे एक कोटी 20 लाखांचा निधी मंजूर झाला होता, पण नारळ फोडण्याव्यतिरिक्त काही काम झाले नाही.
या वेळी आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हा प्रभारी उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन उपस्थित होते.
बिहारमध्ये मतमोजणीचा कल भाजपप्रणित एनडीएकडे झुकल्याबद्दल प्रसाद लाड यांनी भाजप नेतृत्वाचे अभिनंदन केले. बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जबाबदारी दिली होती. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातही त्यांनी ठसा उमटवल्याबद्दल लाड यांनी अभिनंदन केले.
आता आम्ही पालकमंत्र्यांना शोधतो आहोत. जिल्ह्याला सापत्न वागणूक मिळत आहे. शेतकरी, कोविड काळात स्थानिक मंत्री सिंधुदुर्गात फिरत होते. सिंधुदुर्गमध्ये दादांमुळे दरडोई उत्पन्न वाढले, असे ते सांगतात. पण रत्नागिरी जिल्ह्याचे काय हे सामंत कधी सांगणार. रत्नागिरी जिल्हा महागडा म्हणून सर्वश्रुत आहे, अशी टीका प्रमोद जठार यांनी केली.
पंधरा दिवसांपूर्वी रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकार्यांची भेट घेतली होती. भाजपला मजबूत करणार्या या व्यक्ती आहेत. कोविड काळात त्यांची आस्थेने चौकशी केली आहे. अजून काही यादी असेल तर पत्रकारांनी द्यावी, त्यांनाही भेटू, असे चव्हाण यांनी सांगितले.

Comments
Post a Comment