कलकाम कंपनीकडून ठेवीदारांना ३१ लाखाचा चुना

 


वादग्रस्त ठरलेल्या कलकाम मायनिंग अँड लॉजिस्टिक कंपनीचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. ठेवीदारांना कोणताही लाभ न देता तब्बल ३१ लाख ३९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या संचालकांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष दत्तात्रय भाटकर (वेळणेश्वर) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार चिपळूण शहरात स्वामी कॉम्प्लेक्स येथे कलकाम मायनिंग अँड लॉजिस्टिक प्रा. लि. या कंपनीचे कार्यालय होते. ठेवीदारांना वेगवेगळी आमिषे दाखवून या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले गेले होते. वेगवेगळ्या आमिषापोटी अनेकांनी येथे गुंतवणूक केली होती. त्यासाठी काही एजंटही नियुक्त करण्यात आले होते.

संतोष दत्तात्रय भाटकर (वेळणेश्वर) यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. दिनांक १ डिसेंबर २०१६ ते ३ नोव्हेंबर २०२० या काळात कंपनीने ठेवीदारांना कोणताही लाभ न देता तब्बल ३१ लाख ३९ हजार २०० रुपयांची फसवणूक केली, असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

त्यानुसार कलकाम मायनिंग अँड लॉजिस्टिक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर विष्णू पांडुरंग दळवी (४७, ठाणे), डेव्हलपमेंट डायरेक्टर सुनील रघुनाथ वांद्रे (३९, नालासोपारा), यशवंत व्हिवा टाऊनशीप (वसई) आणि विजय चंद्रकांत सुपेकर (४६, नालासोपारा) यांच्याविरूद्ध कलम ४२०, ४०९, ४०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील अधिक तपास करत आहेत.

अनेकांकडून टोपी

सेबी अथवा रिझर्व्ह बँकेकडून कोणतीही परवानगी न घेता थेट आर्थिक गुंतवणूक करून घेणाऱ्या किंवा कृषी क्षेत्रात गुंतवणुकीचे आमीष दाखवणाऱ्या अनेक कंपन्यांनी रत्नागिरीकरांना याआधीही टोप्या घातल्या आहेत. तरीही अशा ठिकाणी गुंतवणूक होतच आहे.

याआधीही तक्रार झाली होती

गुंतवणूक करून घेताना कंपनीने मोठमोठी आमीषे लोकांना दाखवली होती. मात्र ठेवींची मुदत संपल्यानंतर कंपनीने केलेल्या करारानुसार ठेवीदारांना कोणताही लाभ दिला गेला नाही, अशी तक्रार यापूर्वीही दाखल झाली होती. आता पुन्हा एकदा एक घोटाळा समोर आला आहे. यात आणखीही अनेक गुंतवणूकदार फसले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments