संघटना सर्वोपरी, संघटनेचे महत्व जपा – आ.रवींद्र चव्हाण

 


भाजपा जिल्हा कार्यकारिणीची पहिली सभा दिनांक ०१/११/२०२०   रोजी रत्नागिरीमध्ये पार पडली. अॅड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला ८५  कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. सर्व मंडलाचे तालुका अध्यक्ष, सरचिटणीस यांचेसह जिल्हा पदाधिकारी यांची लक्षणीय उपस्थिती सभेला होती. 

आ.रवींद्र चव्हाण, भाजपा प्रदेश सरचिटणीस यांची उपस्थिती व मार्गदर्शन तसेच नवनियुक्त संघटन मंत्री श्री.शैलेंद्र दळवी, श्री. प्रमोद जठार, माजी खासदार नीलेश राणे, अॅड. बाबासाहेब परुळेकर आदी सर्व दिग्गज नेते जिल्हा बैठकीला उपस्थित होते.

जिल्हा बैठकीत देवाज्ञा झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. केंद्रीय मंत्री, कलाकार व अन्य प्रतिथयश मान्यवर याचप्रमाणे माजी नगरसेवक अविनाश साटम, डॉ. रघुवीर भिडे, महादेव आखाडे डॉ. दिलीप मोरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

मा.पंतप्रधानांचे अभिनंदनाचा ठराव

शेती सुधारणा कायदा, कामगार कायदा दुरुस्ती, राम मंदिर उभारणी कामाचा शुभारंभ, नवीन शिक्षण धोरण आदी महत्त्वपूर्ण निर्णया संदर्भाने मा.नरेंद्रजी मोदी पंतप्रधान भारत सरकार व केंद्रीय मंत्रिमंडळ यांचे अभिनंदन करणारा ठराव जिल्हा बैठकीत पारित करण्यात आला. अॅड. महेंद्र मांडवकर, श्री. मिलिंद वैद्य, श्री. श्रीराम भावे, श्री. प्रशांत डिंगणकर यांनी हे ठराव मांडले व ते सभेने टाळ्यांच्या गजरात मंजूर केले.

राज्यशासनाचे अपयशासंदर्भाने ठराव

अवकाळी पावसाने झालेले नुकसानाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना ३००००  नुकसान भरपाईची मागणी करणारा ठराव, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थे संदर्भातील त्रुटी व अपुरी आरोग्य व्यवस्था या संदर्भाने राज्य शासनाच्या निषेधाचा ठराव. तसेच मंदिरे देवालय सुरू करावी ही मागणी करणारा ठराव. तसेच कोव्हीड कालखंडात अखंड सेवा देणाऱ्या पोलीस, आरोग्य, शासकीय कर्मचारी, बँकिंग, पतसंस्था कर्मचारी इत्यादी सर्व कोव्हीड योद्धांना धन्यवाद देण्याचा ठराव जिल्हा बैठकीत पारित केला.

सक्रीय भा.ज.पा.संघटना आढावा

भाजपा दक्षिण जिल्ह्याने गेल्या सहा महिन्यात केलेली, कामे केलेली आंदोलने, कोव्हीड कालखंडात केलेले सेवा कामे या संदर्भाने आढावा जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी घेतला. भाजपाचे कार्यकर्ते धैर्यवान आहेत. कोव्हीड महामारीमध्येही शिर्षस्थ नेत्यांच्या आदेशाप्रमाणे पाच मंडळातील ८०० कार्यकर्ते कोव्हीड कालखंडातही सेवाकार्य करीत होते. याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम झाला आहे. सर्व कार्यकर्त्यांनी अखंडपणे काम केले. या कामामुळे संघटनेला नवी ऊर्जा प्राप्त झाली. सर्व कार्यकर्त्यांना अॅड.पटवर्धन यांनी धन्यवाद दिले. आगामी कालखंडात पाचही मंडलातच्या सर्व बूथ पातळीवर पक्ष संघटना सक्रिय करू. सर्व बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख या रचनेच्या माध्यमातून पक्ष अधिक प्रभावी होईल असा विश्वास अॅड.पटवर्धन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.

आक्रमक राहण्याचे आवाहन

माजी खासदार नीलेश राणे यांनी कार्यकर्त्यांना आक्रमक पद्धतीने कार्यरत होण्याचे व प्रत्येक कठीण प्रसंगात आपण भक्कमपणे कार्यकर्त्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन केले.  संघटनमंत्री श्री.शैलेश दळवी यांनी बूथ पातळीपर्यंत पक्ष संघटनेची संपूर्ण रचना योग्य पद्धतीने झाल्यास पक्ष प्रभावी ठरेल; बूथ रचना सरल अॅपवर कार्यकर्त्यांची "नरेंद्र" या माध्यमातून सक्रिय काम करा असे आवाहन केले. श्री. प्रमोद जठार प्रभारी यांनी भाजपा वाडी-वस्तीवर पोहोचवण्यासाठी नियोजन करून दौरे आयोजित करून केंद्र शासनाचे काम, निर्णय जनतेपर्यंत पोहोचवू त्यासाठी बूथ स्तरापर्यंत यंत्रणा उभारण्याची घोषणा केली.

संघटना सर्वोपरी

संघटनेचे बळ मोठे असते. भारतीय जनता पार्टीत व्यक्तीपेक्षा संघटनेला अधिक महत्व आहे. जिल्ह्यातील संघटना अधिक मजबूत करत बूथ स्तरापर्यंत विस्तारित झाली पाहिजे. केंद्र शासनांच्या योजनांचे लाभार्थी गावोगावी आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. 

महाआघाडी सरकारची अकार्यक्षमता, बेपर्वाई, शेतकर्‍यांकडे केलेले दुर्लक्ष, आरोग्य सुविधांकडे केलेले दुर्लक्ष हे मुद्दे घेऊन जनतेमध्ये जा. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा. ग्रामपंचायत निवडणुका राजकीय भरारी घेण्यासाठी संधी आहे. भाजपचा रत्नागिरीतील वाढता प्रभाव अधोरेखित करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत यश संपादनासाठी सज्ज व्हा असे आवाहन आ. रवींद्र चव्हाण यांनी केले.

या बैठकीमध्ये तालुका मंडलाच्या झालेल्या कार्यक्रमांचा बूथ शक्ती केंद्र प्रमुख नियुक्त्या, कार्यकारणी नियुक्त्या याबाबतचा अहवाल तालुकाध्यक्षांनी सादर केला.जिल्हा बैठकीचे नियोजन नेटके करण्यात आले होते. प्रमुख रस्त्यावर युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे लावून अभ्यागतांचे स्वागताची रचना केली होती. कार्यकर्त्यांना भाजपा प्रसाराचा संदेश आणि कार्यक्रम देत जिल्हाध्यक्ष अॅड.पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली पहिली जिल्हा बैठक पार पडली.



Comments