खोपोलीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट
खोपोली तालुक्यातील साजगाव परिसरातील एका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटाच्या हादऱ्याने झालेल्या पडझडीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर चार सुरक्षारक्षक जखमी झाले आहेत. आर्कोस इंडस्ट्रियल इस्टेटमधील जसनोव्हा कंपनीच्या केमिकल रिअॅक्टरमध्ये रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला.
हा स्फोट एवढा भीषण होता, की जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत आवाज घुमला. या हादऱ्यामुळे शेजारच्या काही कंपन्यांचे शेडही कोसळले. यात एका सुरक्षारक्षकाच्या पत्नीचा मृत्यू झाला. तर तीन ते चार जण जखमी झाले.
या स्फोटात जसनोव्हा कंपनी शिवाय एसएस पेपर ट्यूब आणि पेन ट्यूब या कंपन्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नाही, तर आर्कोस औद्योगिक नगरीच्या आसपास एक किलोमीटरच्या परिसरातीतल अनेक घरांच्या खिडक्यांच्या आणि कंपन्यांच्या काचाही फुटल्या.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या स्फोटामुळे लागलेली आग एवढी मोठी होती, की तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना याश आले.
स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली आणि जवळपास असलेल्या कंपन्यांतील कामगारांना सुरक्षितस्थळी हलवले. जखमींना खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Post a Comment