पालघर जिल्हा काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर ; जिल्हाध्यक्ष पदासाठी दोन गट आक्रमक, डहाणूच्या मोईज शेख यांच्या नावाला सर्वाधिक पसंती

 पालघर जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या वादावरून काँग्रेस मध्ये दोन गट पडल्याचे चित्र आता स्पष्ट असून दिवाळी पूर्वी दोन्ही गटांच्या वेगवेगळ्या बैठका गुप्त ठिकाणी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये दोन्ही गटांकडून जिल्हाध्यक्ष पद आपल्या गटाला मिळविण्यासाठी आक्रमक झाले असून पुढील रणनीती आखली गेली आहे. त्यामुळे पालघर काँग्रेसला लवकरच नवीन जिल्हाध्यक्ष मिळण्याचे संकेत प्राप्त होत आहेत. यावेळी आदिवासी किंवा अल्पसंख्याक समाजाचा अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डहाणूचे ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी  मोईज शेख यांच्या नावाला सर्वाधिक पसंती दिली जात आहे.


 पूर्वीच्या डहाणू लोकसभा मतदारसंघात काँगेसच्या दामोदर शिंगडा यांनी पाच वेळा खासदार म्हणून निवडून येत पक्षाला मोठा जनाधार मिळवून दिला होता. मात्र, त्यानंतर भाजप, बहुजन विकास आघाडी यांच्यापुढे काँग्रेसचे वर्चस्व कमी झाले. विद्यमान जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील यांचा कारभार नाममात्र स्वरूपाचा असून पक्षातील इतरांच्या मनमानीमुळे पक्षाचे नुकसान होत आहे.नुकत्याच झालेल्या पंडित नेहरू जयंतीनिमित्त केवळ चार ते पाच कार्यकर्ते पालघर येथील काँग्रेस भवनात हजर होते. यावरून कार्यकर्त्यांमध्ये पक्षाबद्दल उघड उघड अनास्था दिसून येत आहे.

दुसरीकडे एक वेगळा गट प्रभावीपणे काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठी घेवून विद्यमान जिल्हाध्यक्ष कसे निष्प्रभ आहेत याचे दाखले पुराव्यानिशी सादर करण्यात मग्न आहे. पक्षांतर्गत होंत असलेल्या या घडामोडींमुळे सामान्य कार्यकर्ते संभ्रमात असून त्याचे दूरगामी परिणाम पक्षावर होताना दिसत आहेत.


पालघर जिल्ह्यातील काँग्रेसला उभारी देण्यासाठी धनवान जिल्हाध्यक्ष पाहिजे असे काँग्रेस कार्यकर्ते खाजगीत बोलतात, तर दुसरा गट एकनिष्ठ कार्यकर्त्याला हे पद मिळावे म्हणून प्रयत्नशील आहे. अनेकदा पालघर शहरातील कार्यकर्तेच सभाना अगदी तुरळक हजेरी लावतात व सभा संपण्याआधीच घरचा रस्ता धरतात. स्थानिक नेते व पदाधिकारी सभाना सतत गैरहजर असतात,अशीही कार्यकर्त्यांची तक्रार आहे.

नेहमीच्या रटाळ भाषणांना काँग्रेस प्रेमी कंटाळले असून शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित पुन्हा काँग्रेस मध्ये कसे येतील ? या विषयावरील भाषणांचा कार्यकर्त्यांना कंटाळा आला आहे. पक्ष निरीक्षकानी दोन्ही गटाच्या प्रमुख लोकांना एकत्र बसवून कुठलाही समझोता घडवून आणला नाही, परिणामी पक्ष संघटना दोन गटांमुळे फुटीच्या उंबरठ्यावर आली आहे.



मोईज शेख यांचे नाव चर्चेत:

---

डहाणूतील काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी व एकनिष्ठ कार्यकर्ते मोईज शेख यांचे नाव जिल्हाध्यक्ष पदाच्या चर्चेत असून ते पक्षाचे विद्यमान जिल्हा सरचिटणीस आहेत. ते 1990 पासून पक्षात सक्रीय आहेत. त्यांच्याशिवाय मनोर येथील रुफी भुरे, तवा येथील माजी राज्यमंत्री शंकर नम यांचे पुत्र योगेश नम, वाडा येथील माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे पुत्र सचिन शिंगडा यांच्याही नावांची चर्चा आहे. त्यामुळे अल्पसंख्याक किंवा आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्याची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती होणार हे जवळपास निश्चित आहे.



Comments