आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील वीरपुत्र ऋषीकेश जोंधळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार


आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील वीरपुत्र ऋषीकेश जोंधळे यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ऋषीकेश यांचे चुलत भाऊ दीपक जोंधळे यांनी ऋषीकेषच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. सीमेवर लढताना वीरमरण आलेला पुत्र आज अनंतात विलीन झाला.

अवघ्या वीस वर्षांच्या या जवानाचे अंत्यदर्शन घेताना अनेकांच्या अश्रूंना बांध फुटला. सकाळी गावात अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी 'ऋषीकेश जोंधळे अमर रहे घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.अंत्ययात्रा भैरवनाथ हायस्कूलच्या मैदानात आल्यानंतर पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले.

याठिकाणी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, समरजीत घाटगे, माजी आमदार संजय घाटगे, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी श्रद्धांजली वाहिली. लष्कर आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. त्यानंतर चुलत भाऊ दिपक जोंधळे यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी भारत 'माता की जय'चा जयघोष झाला.

Comments