एकहाती सत्ता असताना जनतेसाठी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करावे हे दुर्दैवी
▪️संगमेश्वर : "करजुवे - पिरंदवणे रस्त्याच्या दुरूस्तीसाठी जाहीर केलेले आंदोलन हे श्रेय घेण्यासाठी नव्हते तर तर नेमके कशासाठी होते?" असा खडा सवाल विचारत तालुकाध्यक्ष अधटराव यांनी शिवसेनेच्या खाडी विभाग प्रमुखांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.
दि. ०१ नोव्हेंबर रोजी बातमी प्रसिद्ध करून तातडीने ०२ नोव्हेंबरला आंदोलन करण्याचे जाहीर करणे आणि त्या वृत्तात १० दिवसांपूर्वीच निवेदन दिल्याचा उल्लेख नसणे हे नेमके काय दर्शवते? आम्ही युतीत असताना खांद्याला खांदा लावून तुमच्या बरोबर होतो. जनतेसाठी यावेळीही बरोबर असूच कारण आमची बांधिलकी जनतेशी आहे. आम्ही सत्तेत असू किंवा नसू पण जनतेच्या प्रत्येक समस्यांसाठी नेहमीच अग्रेसर राहू.
मा. ना. उदयजी सामंत, मा. खा. विनायकजी राऊत यांच्यासारखे कणखर आणि कार्यक्षम नेतृत्त्व तुमच्याकडे असताना तुम्हाला आंदोलन का करावे लागते या प्रश्नाचे उत्तर देण्याचे सोडून बाकी सगळ्या कामांची यादी जाहीर केलीत. जी कामे केलीत ते नैतिक कर्तव्यच होते. यात जनतेवर उपकार केल्याची भावना असण्याचे काहीच कारण नाही.
ज्याच्याकडे सत्ता आहे त्याने विकास कामे आणि योजना राबवून, लोकांच्या अडीअडचणी सोडवल्याच पाहिजेत. पण यासाठी आंदोलनाचा दिखावा करण्याची आवश्यकता नव्हती. आपण तसेही ना. सामंतांपुढे समस्या मांडून तिचे निराकरण करून घेऊ शकत होतात. पण फक्त जनता भाजपबरोबर गेली तर आपल्या वर्चस्वाला धक्का लागेल या विचाराने अस्वस्थ होऊन जो आंदोलनाचा विषय हाताळला तो हास्यास्पद होता.
तसाच काहीसा प्रकार महावितरण कंपनीवर नेलेल्या मोर्चाचा. लॉक डाऊनपश्चात भरमसाठ वीजबिले आली. तुम्ही त्यावर तोडगा काढण्यासाठी मोर्चा काढला होतात. तो कौतुकास्पद होता पण त्याचा परिणाम जनतेची वीजबिले कमी होण्यात झाला नाही किंवा वाढीव मुदत मिळवून देऊ शकला नाहीत. उलट पत्रकारांशी बोलताना वीजबिले भरू नयेत असा सल्ला दिलात व कालांतराने जमेल तसे बिल भरा असे सांगितले. अशा प्रकारे या मोर्चाचा फज्जा उडाला; आणि त्याचा जनतेला काहीही फायदा झाला नाही.
नियमित भाजपवर टीका करणार्या, वारंवार महामहिम राज्यपाल महोदयांचा अवमान करणार्या, whatsapp वर मा. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याविरुद्ध विखारी post करणार्या पक्षाच्या समर्थकांनी ही वेळ तू-तू मैं-मैं करण्याची नाही, ही वेळ राजकारण करण्याची नाही अशा गोष्टी आम्हांस शिकवण्यापेक्षा स्वतः आचरणात आणाव्यात. बाकी १८-१८ तास झटून काम करूनही कोकणाचा कॅलिफोर्निया सोडा पण पायाभूत विकास करता आला नाही. त्यामुळे टीकाटिप्पण्या थांबवून जनतेच्या असहाय्य स्थितीकडे पहा आणि कामांची पूर्तता करा.
एक मात्र खरे राज्याला गरज पडेल तिथे विरोधी पक्षनेत्याकडून केंद्रातून मदत आणायची अपेक्षा केली जाते आणि तशीच इथेही. तुम्ही सक्षमपणे काम केलेत तर आम्हालाही आनंदाच आहे. जनता जनार्दन खुश असेल आम्हीही खुश असू. ज्या हेतूने ना. सामंतांनी तुमच्याकडे काम सोपवले आहे ते काम वेळेत आणि नेमकेपणाने केलेत तर मुळात तुम्हांला तुमच्याच शीर्षस्थ नेत्यांविरुद्ध आंदोलन करावे लागणार नाही. आणि त्यामुळे आम्हीही दोषारोप करणार नाही. पण अशाप्रकारे जर जनतेला गृहीत धरून तुम्ही दिशाभूल करणार असाल तर भाजप आता जनतेबरोबर आहे; हे सदैव लक्षात ठेवा.
हे बोलून झाल्यावर अधटराव पुढे म्हणाले की, माझे महेशजींबरोबर अतिशय उत्तम संबंध आहेत. परंतु वैयक्तिक संबंध एका ठिकाणी आणि राजकीय, सामाजिक संबंध एका ठिकाणी. महेशजींच्या माध्यमातून प्रश्न सुटत असतील तर त्यांचे कौतुक करायला आम्ही अग्रभागी असू. परंतु राजकारण करण्यासाठी, श्रेय लाटून सत्ता मिळवण्यासाठी कोणतेही आततायी कार्य करू नये.

Comments
Post a Comment