महामार्ग उपविभागाने लावलेल्या फलकाला शौकत मुकादमांनी घातला हार

 मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शहरातील बहादूरशेख येथील ब्रिटीशकालीन वाशिष्ठी नदीचे दोन्ही पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे अखेर राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने मान्य केले आहे.या पुलांच्या दोन्ही बाजूला कमकुवत पूल,नावाचे अधिकृत फलक लावले आहेत.हे पूल वाहतूकीसाठी धोकादायक असल्याबाबत माजी सभापती शौकत मुकादम यांच्यासह लोकप्रतिनिधी,राजकीय पदाधिकारी व नागरिकांकडून ओरड होत होती या कमकुवत पुलाबाबत मुकादम यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत पत्र व्यवहार करून संबंधित खात्याचे मंत्री व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.तसेच नवीन पुलांचे कामही लवकरात लवकर मार्गी लागावे,यासाठीही पाठपुरावा करत पुलांसदर्भात झालेल्या बैठकांमध्ये राष्ट्रीय महामार्ग उपविभागाचे अधिकारी हे जुने पुल कमकुवत असल्याचे जाहीरपणे मान्य करत नव्हते.तसेच त्यासंदर्भात बोलण्यासही टाळत होते.परंतू या विभागाने स्वतःहून वाशिष्ठी नदीवरील जुने पूल कमकुवत असल्याचा फलक लावल्याने शौकत मुकादम यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.अधिकारी उशीरा का होईना पण खरे बोलले असा टोला लगावत त्यांनी बहादूरशेख नाका येथील पुलावरील फलकाला हार घातला . यावेळी मनोज जाधव ,सचिन साडविलकर ,राम शिगवण , नाना भालेकर ,विलास पवार , दिपक शिगवण ,अशोक भुवड आदी उपस्थित होते


Comments