काटवली येथील सौ. पूजा उबारे यांची भाजप महिला आघाडी, संगमेश्वरच्या तालुका सचिवपदी नियुक्ती
तालुक्यातील काटवली येथील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या सौ. पूजा बाळकृष्ण उबारे यांची निवड भाजप संगमेश्वर, महिला आघाडीच्या कार्यकारिणीवर करण्यात आली असून तालुका सचिव म्हणुन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप महिला आघाडी संगमेश्वरच्या, तालुकाध्यक्षा सौ. कोमलताई रहाटे यांनी ही नियुक्ती केली.
दि. ६ नोव्हेंबर रोजी रात्री ०८:३० वाजता काटवली येथे कार्यक्रम सुरू झाला. ११:०० वाजता समारोप झाला. या प्रसंगी बोलताना कोमलताई म्हणाल्या की इतक्या उशिरापर्यंत काम फक्त आणि फक्त समाजकार्य करणार्या महिलाच करू शकतात. आणि यामध्ये कोणत्याही ठिकाणी पहायला गेलात तर भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीवर दिसतील.
आज या ठिकाणी ४५ महिला उपस्थित आहेत. आणि यापैकी बर्याच जणी कार्यकर्त्या असून त्यांच्याकडे आगामी काळात पक्षाच्या जबाबदाऱ्या देण्याचा आमचा प्रयत्न राहील. भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षाची भूमिका ही "कार्यकर्ता कर्ताधर्ता" अशी असल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपण ३०३ जागांसह प्रचंड बहुमताचे सरकार मा. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणू शकलो. तर याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये १०५ ठिकाणी भाजपचे कमळ फुलवले होते. मात्र अनपेक्षित दगाबाजीमुळे आपण सत्ता गमावून बसलो.
तरीही कार्यकर्त्या माता भगिनींनी खचून न जाता प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपण कोकणातही कमळ निश्चितपणे फुलवू शकतो. गरज आहे ती फक्त पूजाताईंसारख्या सक्षम कार्यकर्त्याची. आपल्यावर पक्षाने फार मोठा विश्वास टाकला आहे तो आगामी काळात आपल्याला सार्थ करायचा आहे. असे सांगत कार्यकर्त्या महिलांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन कार्य करत राहण्याचा प्रेमळ सल्ला द्यायला कोमलताई विसरल्या नाहीत.
यावेळी पूजाताई आपल्या मनोगतात म्हणाल्या, एका राष्ट्रीय पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेऊन तालुका कार्यकारिणीमध्ये सम्मानपूर्वक पद दिले त्याबद्दल मी पक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांची ऋणी आहे. पक्षाचा हा विश्वास सार्थ ठरवून तो वृद्धिंगत करणे आणि पक्षाचा जास्तीतजास्त विस्तार करत नागरिकांना पक्षाशी जोडणे हेच माझे ध्येय असेल. याप्रसंगी संगमेश्वर भाजपच्या तालुका उपाध्यक्षा सौ. राजश्रीताई कदम, तसेच कार्यकर्ते श्री. जितेंद्र सुर्वे उपस्थित होते.

Comments
Post a Comment