चिपळुणात एका 45 वर्षीय प्रौढाचा खून
चिपळूण शहरातील उपनगर काविळतळी परिसरात चिपळूणकर गल्ली परिसराच्या भागात एका ४५ वर्षीय प्रौढाचा त्याच्याच कुटुंबातील एका सदस्याने खून केल्याची घटना रविवारी दि. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचनंतर उघडकीस आली.
याबाबत सायंकाळी उशिरा चिपळूण पोलिस ठाण्यात माहिती मिळताच पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काविळतळी भागात वास्तव्यास असलेले वसंत चिपळूणकर यांचा पुतण्या संशयित गणेश चिपळूणकर याने रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घरगुती कारणातील वादानंतर वसंत चिपळूणकर यांच्या डोक्यात प्रहार केला.
यात गंभीर जखमी झालेल्या वसंत चिपळूणकर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्यानंतर संबंधित संयशिताने तेथून पलायन केले. लाकडी दांडक्याने तसेच दगडाने प्रहार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. घटना घडल्यानंतर काही वेळाने परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार नागरिकांनी चिपळूण पोलिस ठाण्याला कळवले. माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत रीतसर गुन्हा नोंदवणे व तपासाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Comments
Post a Comment