IPL 2020 : धोनीच्या चेन्नईची वणवण संपणार?


महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे मंगळवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या लढतीत विजय मिळवून ते दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना दमदार प्रारंभ करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

चेन्नईचा संघ तूर्तास सात सामन्यांतून अवघ्या चार गुणांसह सातव्या स्थानी आहे. त्याशिवाय हैदराबादविरुद्धच्या मागील लढतीत त्यांना सात धावांनी पराभव पत्करावा लागला होता. सलामीवीर शेन वॉटसन आणि फॅफ डय़ू प्लेसिस त्यांच्यासाठी सातत्याने योगदान देत असले तरी मधल्या फळीत धोनीसह अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा यांना कामगिरी उंचावण्याची गरज आहे. केदार जाधवच्या जागी गेल्या लढतीत एन. जगदीशनला स्थान देण्यात आले होते. परंतु तोही फारसा प्रभाव पाडू शकला नाही. फलंदाजीच्या क्रमाचे कोडे सोडवणे, हेच धोनीपुढील प्रमुख आव्हान असेल.

शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर ही वेगवान भारतीय जोडी चेन्नईच्या गोलंदाजीची धुरा वाहत असून फिरकीपटू कर्ण शमाने पियुष चावलाच्या अनुपस्थितीत उत्तम गोलंदाजी केली आहे. सॅम करण अष्टपैलू खेळाडूची भूमिका चोखपणे बजावत आहे.

दुसरीकडे, डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबादला भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीचा फटका गेल्या लढतीत बसला. राजस्थानच्या पाच फलंदाजांना १५ षटकांच्या आत माघारी पाठवूनही अननुभवी गोलंदाजांच्या फळीमुळे ते अखेरच्या २४ चेंडूंत ५४ धावांचा बचाव करू शकले नाहीत. फिरकीपटू रशिद खान हैदराबादचा हुकमी एक्का असून पुन्हा एकदा त्याच्यावरच हैदराबादच्या गोलंदाजीची भिस्त असेल.

फलंदाजीत वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्यापैकी किमान एकाने मोठी खेळी साकारणे आवश्यक आहे. मधल्या फळीत केन विल्यम्सन आणि मनीष पांडे सामन्याच्या परिस्थितीनुसार फटकेबाजी करण्यात पटाईत असले तरी युवा प्रियम गर्ग आणि अब्दुल समद या युवांवर अवलंबून राहणे हैदराबादला महागात पडू शकते.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ सिलेक्ट

९-४ उभय संघ ‘आयपीएल’मध्ये १३ वेळा आमनेसामने आले असून चेन्नईने नऊ, तर हैदराबादने चार सामने जिंकले आहेत.

Comments