लोटे एमआयडीसी मधील कारखान्यांचे रासायनिक विषारी पाणी जगबुडी व वाशिष्ठी खाडीत सोडले जात असल्याने मच्छीमारी व्यवसाय नष्ट होतोय
मागिल तीस वर्षांपासून लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे रासायनिक विषारी पाणी शुद्धीकरण न करता सोनपात्र नदिच्या मार्फत जगबुडी व वाशिष्ठी खाडीमध्ये सोडले जात आहे. यामुळे या नदिपात्रांमधून मासे उपलब्ध होत नाहित. यामुळे येथील स्थानिक भोईबांधवांचा मच्छीव्यवसाय कायमचा नष्ट झाला आहे. याबाबत या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळालेली नाही.
या पार्श्वभूमीवर दर्यासारंग मच्छिमार भोईसमाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष सुनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या औचित्याने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.विजय भोसले, माजी विधान परिषद आमदार सौ.हुस्नबानू खलिफे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव आदी पदाधिका-यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
यावेळी सौ.हुस्नबानू खलिफे म्हणाल्या की मी या समस्येबाबत विधान परिषदेच्या अधिवेशन काळात प्रश्न उपस्थीत केला होता. त्यावेळी लोटे एमआयडीसी येथील कारखान्यांमधील पाणी नदीपात्रांमध्ये सोडण्यात येऊ नये अशी मागणी केली होती. आणि यापुढेही कॉंग्र्र्स पक्ष तुम्हा सर्व आंदोलन कर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी उभे राहू असे आश्वासन दिले.

Comments
Post a Comment