वाचकांना घरपोच पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी वाचक प्रेरणा दिनापासून नवीन योजना प्रारंभ करणार :-ॲड.दीपक पटवर्धन



रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय येत्या वाचक प्रेरणा दिनापासून वाचकांसाठी घरपोच पुस्तक सुविधा उपलब्ध करणार अशी घोषणा नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दिपक पटवर्धन यांनी केली. व वाचक प्रेरणा दिनापासून वाचनालय सुरू करण्याची परवानगी शासनाने दिल्यास वाचन प्रेरणा दिनापासून  वाचकांना रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय त्यांच्या मागणीप्रमाणे पुस्तके घरपोच देण्यासाठी नवीन योजना कार्यान्वित करीत आहे. covid-19 च्या या महामारीच्या कालखंडामुळे वाचनालय बंद होती. 

अद्यापही covid-19 पूर्ण नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना वाचनालयात येणे कठीण जाणारे असल्याने तसेच वाचनालयाची नवीन योजना म्हणून वाचक सभासदांसाठी त्यांच्या मागणीनुसार महिन्यातून दोन वेळा पुस्तक बदलून नवीन पुस्तक घरपोच देण्याची सुविधा रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय राबवणार आहे. ही योजना सशुल्क असणार आहे. 

महिन्यासाठी रूपे 100/- एवढे शुल्क आकारले जाईल सहा महिन्यासाठी रुपये 550/- एवढी रक्कम अनामत भरून घेतली जाईल .वाचकांनी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय हे पुस्तकांची नोंद असलेले ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घेऊन त्या ॲप मधून आपल्याला हवे असणारे पुस्तक निवडून त्याचा क्रमांक वाचनालयात दूरध्वनीद्वारे अथवा मोबाईल द्वारे नोंदवायचा आहे. नोंदणी केल्यानंतर पुढच्या दिवशी अगर सोयीनुसार सदर पुस्तक वाचक सभासदाकडे पाठविण्यात येईल. 

जुने पुस्तक वाचकाने वाचनालयाच्या संबंधित पुस्तक घेऊन आलेल्या प्रतिनिधीकडे जमा केल्यानंतर नवीन पुस्तक वाचकाला उपलब्ध करून दिले जाईल. सर्वसाधारणपणे महिन्यातून दोन वेळा पुस्तक बदलून देण्याची ही सेवा दिली जाईल. अधिक वेळा अथवा कमी कालावधीत पुस्तक बदलून हवे असल्यास त्यासाठी त्याप्रमाणात शुल्क आकारले जाईल. फ्लॅट, अपार्टमेंट, बिल्डींग मध्ये राहणाऱ्या सभासद वाचकांना इमारती खालील प्रवेशद्वाराजवळ वाचनालयाचा  प्रतिनिधी पुस्तक आणून देईल. 

गृहनिर्माण संस्थांचे त्रयस्थ माणसाच्या प्रवेशासंबंधी असलेले नियम लक्षात घेऊन वाचनालयाचा प्रतिनिधी फ्लॅट पर्यंत न जाता इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ पुस्तक घेऊन जाईल. त्या ठिकाणी येऊन आपले आपल्याकडील वाचलेले पुस्तक परत देऊन नवीन पुस्तक वाचक उपलब्ध करून घेऊ शकेल. जमा पुस्तकाची व नव्याने वितरित केलेल्या पुस्तकाची नोंद वाचनालयाचा प्रतिनिधी समक्ष करेल.

ज्या वाचकांना या योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या कार्यालयात सकाळी 10.00 ते 12.00वा. या कालावधीत नोंद करणे आवश्यक आहे.

वाचनालयाची सेवा अधिक वाचकाभिमुख करण्याचा हा प्रयत्न वाचकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास वाटतो. वाचकांनी घरपोच पुस्तक योजनेचा उचित लाभ घेऊन आपली वाचन तृष्णा भागवावी.

नाविन्यपूर्ण असा हा उपक्रम वाचक सभासदांच्या पसंतीस पात्र ठरेल. लवकरच वाचकसंख्येतही भरगोस वाढ झालेली दिसेल. या योजनेचा लाभ जुन्या सभासद वाचकांना नव्याने वाचक सभासद होणाऱ्या वाचकांनाही घेता येईल. प्रारंभी ही सुविधा रत्नागिरी शहर क्षेत्रापुरतीच मर्यादित राहणार आहे.

घरपोच पुस्तक पोच योजनेबरोबरच काही डिजिटल ऑडिओ बुक्स सुविधा प्रायोगिक तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. निहित व्यवसायिक शुल्कापेक्षा कमी शुल्कामध्ये ही योजना वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असून प्रतिथयश आस्थापनेशी याबाबत बोलणे अंतिम टप्प्यात  असल्याची माहिती ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

वाचनालयाच्या सर्वच उपक्रमांना वाचक सभासद भरगोस प्रतिसाद देतात. तसाच प्रतिसाद नव्याने सुरू होत असलेल्या योजनांनाही वाचकांनी द्यावा असे विनम्र आवाहन रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दिपक पटवर्धन यांनी केले आहे.

Comments