पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहिर, रत्नागिरी जिल्हा तिस-या क्रमांकावर



दिनांक 9 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये एकुण 36 जिल्ह्यांमध्ये आपला रत्नागिरी जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे आणि याचे श्रेय जिल्हा गुणवत्ता कक्षाला द्यावे लागेल. जो फक्त शिष्यवृत्ती परिक्षेसाठी स्थापन झालेला होता. राज्यात कोकण बोर्डाची स्थापना झाल्यापासून कोकण बोर्ड इ.10 वी व 12 वीच्या परिक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम आहे. 

असे असताना जिल्हा परिषदेच्या शाळेमधील पट व त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यामध्ये दिवसेंदिवस वाईट परिस्थिती निर्माण होत आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विदयार्थ्यांची पटसंख्या टिकवून ठेवून व त्यामध्ये वाढ करणेसाठी दरवर्षी शासनामार्फत व जिल्हा परिषद रत्नागिरी मार्फत विविध उपक्रम राबविले जातात. मात्र एकच लक्ष्य ठेवून उपक्रम न राबविला गेल्यामुळे परिणामकारक अंमलबजावणी होत नाही. म्हणून शैक्षणिक गुणवत्ता वाढ व शिष्यवृत्ती सहित सर्व स्पर्धा परिक्षा यासाठी एक स्वतंत्र कक्ष स्थापन करुन या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद शाळांचे स्थान उंचावणे हेच मुख्य लक्ष ठेवण्यात आलेले आहे. आजच्या युगामध्ये स्पर्धा परिक्षांचे  महत्व अनन्यसाधारण आहे. 

त्यासाठी विदयार्थी व शिक्षक स्पर्धा परिक्षेच्या क्षेत्रात पारंगत असणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक व विदयार्थी यांचेमध्ये स्पर्धा परिक्षेविषयी सखोल ज्ञान देणेसाठी ही योजना महत्वाची ठरेल व आधीच गुणवान असलेले शिक्षक व विदयार्थी यांना मोठी संधी मिळेल. एकाच वेळी अनेक उपक्रम न राबवता यामध्ये स्पर्धा परिक्षा हेच लक्ष्य ठेवून ही योजना राबविणेत येईल व या काळात शिष्यवृत्ती परिक्षा हेच गुणवत्ता दाखविण्याचे साधन असल्यामुळे सर्वांना एक संधी मिळेल. या कक्षामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, दोन जिल्हा परिषद सदस्य होते. या सर्वांचे मार्गदर्शनाखालील पध्दतीनुसार वर्षभर कामकाज करणेत आले. त्याचेच फळ म्हणून गेल्यावर्षी 56 विद्यार्थी 210 मार्कांच्या वर म्हणजे गुणवत्ता यादीत होते. तर यावर्षी तब्बल 207 विद्यार्थी 200 गुणांच्या वर आहेत. 

जिल्हा गुणवत्ता कक्षाने खालीलप्रमाणे कार्य केले. स्वतंत्र कक्षाची कार्यपद्धती:- सर्वप्रथम बीट हे लक्ष्य घेवून शिष्यवृत्ती संबंधी सर्व अधिकारी व शिक्षकांना मार्गदर्शन करणे, इ.5 वी व 8 वीचे 100 टक्के विदयार्थी परिक्षेला बसविणे व त्यासाठी प्रोत्साहन देणे, शिष्यवृत्ती परिक्षेस बसलेल्या विदयार्थ्यांच्या प्रत्येक शाळेला भेट देण्याची व्यवस्था करणे, प्रत्येक आठवडयाला एक सराव पेपर संबंधित शाळेपर्यंत पोहचवणेची व्यवस्था करणे, सराव पेपर झाल्यानंतर त्याचे विश्लेषण करुन व अधिकाधिक गुण कसे वाढवता येतील याबाबत त्या तालुक्यातील शिष्यवृत्तीला शिकवणाऱ्या शिक्षकांची दरमहा कार्यशाळा घेणेबाबत संनियंत्रण करणे, शिष्यवृत्ती संबंधित व्हिडीओ लेक्चर्स संबंधित शाळांपर्यंत पोहोच करणे, ठरविलेले दरमहाचे उद्दिष्ट पूर्ण होते की नाही याची अवलोकन करणे, महिन्याच्या शेवटी नियंत्रण व मार्गदर्शन समितीला लेखी अहवाल सादर करणे अस आहे.

या निकालाच्या यशाचे श्रेय जिल्हा गुणवत्ता कक्षासोबतच शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांचेसह सर्व गट शिक्षणाधिकारी, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख व शिक्षकांना जाते असे मत रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी व्यक्त केले आहे.



Comments