सावर्डेच्या माजी सरपंच मुमताज मोडक यांचे निधन



सावर्डे गावच्या माजी सरपंच आणि सहकार महर्षी स्व. गोविंदराव निकम यांचे  विश्वासू सहकारी स्व. इ. का. मोडक यांच्या पत्नी श्रीमती मुमताज मोडक यांचे शनिवारी (ता. 17) दीर्घ आजाराने निधन झाले.श्रीमती मुमताज मोडक यांनी 1981 ते 1086 या कालावधीत सावर्डेच्या सरपंच म्हणून काम पाहिले होते. गावच्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान श्रीमती मोडक यांनी पटकावला होता. त्यांचे पती स्व. इ. का. मोडक हे सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक व माजी खासदार स्व. गोविंदराव निकम यांचे विश्वासू सहकारी होते. स्व. मोडक हे सावर्डेचे तब्बल 18 वर्षे सरपंच होते. 

स्व. गोविंदराव निकम यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जिल्ह्यात सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पत्नी श्रीमती मोडक यांनीही जिल्हा सहकार बोर्डाच्या माध्यमातून सहकार चळवळीला बळकटी देण्याचे काम केले होते. जिल्हा सहकार बोर्डाच्या अध्यक्षा म्हणून काम करताना त्यांनी स्व.निकम यांना अभिप्रेत असे काम करत सहकार क्षेत्रात महिलांना प्रेरणादायी कार्य केले. श्रीमती मोडक यांनी जिल्हा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. 

दीर्घ आजारामुळे आज शनिवारी सकाळी 7.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने सावर्डे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात  चार मुलगे, एक मुलगी, सूना, नातववंडे असा परिवार आहे.

Comments