जैविक कचरा संदर्भात जिल्हा भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर चव्हाण यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी


रत्नागिरी शहर व आजुबाजुच्या काही भागातील काही खाजगी हॉस्पिटल्स व दवाखान्यांमध्ये तयार होणारा जैविक कचरा मान्यताप्राप्त कारखान्याकडे न देता साळवी स्टॉप येथील घन कचरा व्यवस्थापन केंद्रात टाकला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधीत हॉस्पिटल्स व दवाखाने यांची तात्काळ तपासणी करुन सदोष हॉस्पिटल्स व दवाखाने यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी रत्नागिरी जिल्हा भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

दवाखाने, हॉस्पिटल्स या ठिकाणी जैविक कचरा निर्माण होतो त्या जैविक कच-याचे विघटन मान्यताप्राप्त कारखान्यात झाले पाहिजे असा नियम आहे. रत्नागिरी जिल्ह्यात लोटे एम.आय.डी.सी. येथे असा कारखाना आहे. या कारखान्यातून एक गाडी दररोज रत्नागिरीत येते. या कारखान्याचे सर्व डॉक्टर, दवाखाने यांनी सदस्य व्हायचे असते. त्यानंतर दवाखान्यात किंवा हॉस्पिटल्स मध्ये तयार होणारा जैविक कचरा त्या गाडीमध्ये विल्हेवाट करण्यासाठी द्यायचा आहे. परंतू रत्नागिरी जिल्ह्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच डॉक्टर्स व दवाखाने, हॉस्पिटल्स या लोटे येथील कारखान्याचे सदस्य आहेत. 

अन्य सर्व हॉस्पिटल्स या कारखान्याचे सदस्य नाहित. रत्नागिरी शहरातील बरेचसे दवाखाने, हॉस्पिटल्स जैविक कचरा नगर परिषदेच्या घंटागाडीतच देतात. असे निदर्शनास आले आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी लक्ष्मिनारायण मिश्रा यांनी तात्काळ हॉस्पिटल्स, छोटे छोटे दवाखाने यांचे तपासणी करुन दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रत्नागिरी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर चव्हाण यांनी केली आहे.

Comments