डिंगणी-करजूवे रस्त्याचे काम वेळेत न सुरू केल्यास भाजप उभारणार जन आंदोलन
संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी -करजूवे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावरुन वाहन चालवताना चालकांची व प्रवाशांची दमछाक होत आहे. या रस्त्याचे काम आठ दिवसाच्या आत सुरू न झाल्यास स्थानिक नागरिकांना सोबत घेवून जनआंदोलन छेडण्याचा इशारा भाजपतर्फे देण्यात आला आहे.
तालुक्यातील संगमेश्वर ते करजुवे मार्गावरील डिंगणी ते करजुवे या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. या मार्गावरून वाहन चालवताना वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रवासाच्या सुरुवातीसच कधी एकदा प्रवास संपतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्याचे काम कोरोनामुळे अर्धवट राहिले हे सध्याचे कारण खरे असले तरीही त्या आधीही या रस्त्याची परिस्थिती जैसे थेच होती. त्यामुळे एकीकडे नितीन गडकरी अत्युच्च दर्जाचे रस्ते तयार करून देशांतर्गत दळणवळण गतिमान करत आहेत, कोकणातील नेते मंडळी मात्र त्यावर कडी करण्यासाठी नागरिकांना चंद्रावर वाहन चालवण्याचा अनुभव देत आहेत, असा आरोप करण्यात येत आहे.
संगमेश्वर हा तालुका जरी असला तरी सर्व शासकीय कार्यालये देवरुख येथेच आहेत. त्यामुळे खाडी भागातील भिरकोंड, डिंगणी, फुणगूस, देण, मांजरे, कोंड्ये, पिरंदवणे, करजूवे या गावांतील नागरिकांना एसटी बस, दुचाकी आणि चार चाकी वाहनांनी प्रवास करणे अनिवार्य आहे. शिवाय फुणगूस हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने तिथे जाईपर्यंत सर्व रस्त्याला खड्ड्यांनी व्यापले आहे.
त्यामुळे भाजीपाला आणणे, बाजारहाट करणे, बँकेचे व्यवहार, सरकारी कामे एक ना अनेक कारणे आहेत ज्यामुळे स्थानिकांना या रस्त्यावरून प्रवास करावाच लागतो. या प्रकरणी ग्रामपंचायती, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे नेहमीप्रमाणे उदासीन आहेत. यामुळेच भाजप संगमेश्वरचे नेते राकेश जाधव व संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्थानिक कार्यकर्ते आंदोलन करून या प्रश्नाला वाचा फोडणार आहेत.
त्यासंबंधीचे निवेदन सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर 2020 रोजी बांधकाम विभाग संगमेश्वर येथे सादर करणार आहेत. यामध्ये ही समस्या प्राधान्याने सोडवा, अशी विनंती निवेदनातून केली जाणार आहे. मात्र 8 दिवसांच्या आत रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास भाजप कार्यकर्त्यांसहित स्थानिकांचे आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला जाणार आहे. स्थानिकांना आवाहन करताना राकेश जाधव व मिथुन निकम म्हणाले, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. हे आंदोलन भाजपप्रणित असले तरी आपल्या सर्वांच्या सहयोगाने त्याचे जनआंदोलनात रूपांतर होईल.
रस्त्याच्या स्थितीत बदल घडवायचा असेल तर आता एकजुट केलीच पाहिजे. याप्रसंगी श्री. राकेश जाधव, श्री. मिथुन निकम, श्री. योगेश मुळे, श्री. दिपक सि. चाळके, खाडी विभाग शक्ती केंद्र प्रमुख, श्री. विजय गुरव, ओबीसी सेल तालुका कार्यकारणी सदस्य, श्री. मुरलीधर चाळके, डिंगणी बूथ प्रमुख, श्री. दिपक राऊत, डिंगणी कुरण बूथ प्रमुख, श्री. किरणजी भोसले, फुणगुस बूथ प्रमुख, श्री. जयकुमार चाळके, युवा मोर्चा तालुका कार्यकारणी सदस्य, श्री. मयूर निकम, युवा मोर्चा तालुका कोषाध्यक्ष, श्री. राकेश चाळके, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष, श्री. सचिन राऊत, तालुका कार्यकारणी सदस्य, श्री. विशाल कदम, श्री. विनोद खांबे, श्री. मजीदभाई खान आदि कार्यकर्त्यांनी जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्याची दखल बांधकाम विभागाकडून केव्हा घेतली जाते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Comments
Post a Comment