राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत पिरंदवणे येथे शेतकरी बांधवांना प्रशिक्षण
संगमेश्वर तालुक्यातील पिरंदवणे येथे भारताचे द्वितीय पंतप्रधान व 'जय जवान, जय किसान' घोषणेचे उद्गाते भारतरत्न श्री. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिरंदवणे ग्रामपंचायत व कृषी विभाग, संगमेश्वर यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस बापूजी व शास्त्रीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यानंतर राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मृदा आरोग्य पत्रिका पथदर्शी कार्यक्रम सन् 2020-21 याविषयी विस्तृत माहिती देण्यात आली. तसेच मग्रारोहयो फळबाग लागवड, ''विकेल ते पिकेल'' संकल्पना याबाबत ही विस्तृत विवेचन केले. सदर कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी श्री. सुरडकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी जैविक व सेंद्रीय खतांचा वापर व महत्व, त्यासाठी शेतात उपलब्ध साधनसामुग्रीचा जमिनीत सुयोग्य प्रमाणात वापर, जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म, जमिनीतील जिवाणूचे महत्व, पिकांचा फेर पालट तसेच स्मार्ट प्रकल्प यांविषयी सविस्तर माहिती दिली.
शेतीच्या पारंपरिक पद्धती व आधुनिक पद्धतींचा उहापोह करण्यात आला. आधुनिक तंत्राची जोड दिल्यास शेती फायदेशीर होईल असा विश्वास शेतकरी मित्रांना देण्यात आला. यानंतर कृषी सहाय्यक श्री. एस. व्ही. बोडखे यांनी जमीन आरोग्य पत्रिका, त्यातील शिफारशीनुसार खतांचा संतुलित मात्रेत वापर, एकात्मिक मूलद्रव्य व्यवस्थापन तसेच सूक्ष्म मूलद्रव्यांचे महत्त्व आणि कार्य यासंबंधी मार्गदर्शन केले. पुढील सत्र श्रीम. राजपूत मॅडम यांनी घेतले. यात त्यांनी मातीचा नमूना कोठे, कसा व किती खोलीवर घ्यावा याची संपूर्ण माहिती शेतकर्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितली.
कार्यक्रम पिरंदवणे येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवीच्या सहाणेवर, गुरववाडी येथे संपन्न झाला. पन्नासहून अधिक शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. यात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही होती की उपस्थित शेतकरी बांधवांपैकी सत्तर टक्के शेतकरी तरुण वर्गातील होते.
याशिवाय कृषी सहाय्यक श्री. बोडखे साहेब, कृषी सहाय्यक श्रीम. पाटील मॅडम, कृषी सहाय्यक श्री. घडशी साहेब, कृषी सहाय्यक श्रीम. बारवे मॅडम, कृषी सहाय्यक श्रीम. राजपूत मॅडम, कृषी सहाय्यक श्री. दौंड साहेब, कृषी सहाय्यक श्रीम. टाकळे मॅडम उपस्थित होत्या. याशिवाय तलाठी श्री. सोनावणे साहेब, ग्रामपंचायत सरपंच सौ. माधवी गुरव, ग्रामसेविका सौ. माया गुरखे, ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रकाश गमरे, तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक श्री. सूर्यकांत मुळ्ये उपस्थित होते.


Comments
Post a Comment