देशाची परिस्थिती बिकट.. नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीवर काँग्रेस नेत्याची सडकून टीका
देशात सध्या जे काही सुरू आहे. त्यावरून देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालली आहे, अशी सणसणीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केला आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी पंढरपूरात येऊन ज्येष्ठ नेते सुधाकर पंत परिचारक, भागवताचार्य वा.ना. उत्पात, कीर्तनकार रामदास महाराज जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांचं सांत्वण केलं.
मोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था घसरत आहे. सामाजिक शांतता नाही. महिलांवर अत्याचार वाढत आहेत, असे आरोप सुशीलकुमार शिंदे यांनी केले. या सगळ्या घटनांमुळेच देशातील परिस्थिती मृतावस्थेकडे चालल्याची टीका शिंदे यांनी केली.
विरोधकांनी एकत्र येण्याची गरज..
देशातील विरोधी पक्ष विस्कटलेला आहे. देशहितासाठी आता सगळ्या विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सोशल मीडियातून काही फेक अकाऊंट बनवून मुंबई पोलिसांची बदनामी केली. सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराचा मलाही फटका बसला आहे. त्याचा वापर विचार करून करावा, असा सल्ला देखील शिंदे यांनी दिला आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला.
प्रणिती शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपसह युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनात यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही प्रणिती शिंदे यांनी केली होती.
उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आहे. तिथे महिला आणि दलितांवर सातत्याने अत्याचार केले जात आहेत. त्यात हाथरस येथे दलित मुलीवर झालेल्या गॅंगरेप करण्यात आला, ही घटना तर अत्यंत भयावह आहे. पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. युपी पोलिसांनी पीडितेची तक्रार न घेतल्यानं ही घडला घडली आहे. धक्कादायक म्हणजे स्थानिक प्रशासनानं पीडितेच्या पार्थिवावर परस्पर अंत्यसंस्कार केले. कुटुंबीयांना तिचं अंत्यदर्शनही घेऊ दिलं नाही.

Comments
Post a Comment