२०१९-२० ची वार्षिक सभा न घेता लाभांश वाटपासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी संस्थाचालक मंडळास परवानगी

 


कोरोना संक्रमण काळ लक्षात घेता २०१९-२० ची वार्षिक सभा न घेता लाभांश वितरित करण्याची परवानगी प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर सहकारी पतपेढी संस्था संचालक मंडळांना देण्यात यावी यासाठी  दिनांक ०७ ऑगस्ट २०२० आणि दिनांक २१ ऑगस्ट २०२० रोजी मा.बाळासाहेब पाटील ( सहकार व पणन मंत्री ), सहकार विभाग राज्यमंत्री श्री.विश्वजित कदम,   कोकण विभाग शिक्षक आमदार श्री. बाळाराम पाटील, मा.सहकार आयुक्त श्री.अनिल कवडे, मा. अप्पर निबंधक पुणे यांना निवेदन देण्यात आले होते. कोरोना संक्रमण काळ असल्याने वार्षिक सभा घेणे शक्य नसल्याने सभासद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे लाभांश पासून वंचित राहिले होते. म्हणूनच कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वार्षिक सभा न घेता लाभांश वाटप करण्यात यावे अशी मागणी मुंबई अध्यक्ष श्री. तानाजी कांबळे यांची होती. याबाबत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई चा शासन दरबारी पाठपुरावा सुरू होता.

१४ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई ची मागणी मान्य झालेली असून वार्षिक सभा न घेता लाभांश वितरित करणे व अन्य महत्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार संचालक मंडळांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. लवकरच याबाबतचा अधिकृत शासन परिपत्रक सहकार विभागाकडून निर्गमित करण्यात येईल.  साधारण दिवाळी पर्यंत लाभांश सर्व सभासद शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी प्राथमिक माहिती  सहकारी पतपेढी पदाधिकाऱ्यांकडून मिळाल्याचे सचिव श्री. अलीम सय्यद यांनी सांगितले. कोकण विभाग शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील यांनी या प्रश्ना संदर्भात वेळोवेळी मंत्रालयात संबंधित मंत्री महोदयांकडे याबाबत सतत पाठपुरावा केला, त्याबद्दल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे विभाग संघटक श्री. मंगेश डांगे व श्री. सुनील बावीस्कर यांनी श्री. बाळाराम पाटील यांचे आभार मानले.

Comments