अतिवृष्टीमुळे मंडणगड तालुक्यातील आतखोल येथील रस्ता खचल्याने मंडणगड-कुडुक-नरवण एस.टी. सेवा खंडीत

 


मागील ४ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मंडणगड तालुक्यातील मंडणगड-कुडुक-नरवण एस. टी सेवा खंडीत करण्यात आली होती. कारण त्या मार्गात येणाऱ्या आतखोल येथे रस्ता खचल्याने गाडी मार्ग बंद झाला होता. याची दखल घेत कुडुक खुर्द गावचे ग्रामस्थ श्याम खैरे, विठ्ठल खैरे, विश्र्वास खैरे यांनी पंचायत समिती मंडणगड येथे शिवसेना माजी विभागप्रमुख अर्जुन भोसले यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली. तेव्हा त्यांनी शिवसेना तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर व शहर प्रमुख विनोद जाधव यांची भेट घेतली.

सदर प्रकरणात शिवसेना माजी विभागप्रमुख अर्जुन भोसले यांनी त्वरीत त्या खचलेल्या रस्त्याची पाहणी करून त्या ठिकाणी भराव घालून मंडणगड पंचायत समिती बांधकाम विभागाकडून ना-हरकत संमतीपत्र घेतले. त्या प्रसंगी नवनिर्वाचित सभापती सौ. सकपाळ यांचे सहकार्य लाभले.

मंडणगड आगार व्यवस्थापक श्री. फडतरे यांची भेट घेऊन ना-हरकत संमतीपत्र त्यांस सुपुर्द करुन सदरची प्रवासी एस.टी वाहतूक सेवा सुरळीत करुन दिली. त्या प्रसंगी कुडुक खुर्द गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. लोकांचा खडतर प्रवास सुखमय व्हावा या उद्देशाने ही एस.टी सेवा अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ववत करण्यात आली आहे. याबाबत मंडणगड पंचायत समिती सभापती, उपसभापती, अर्जुन भोसले, तालुकाप्रमुख यांचे कुडुक खुर्द ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात येत आहेत.

Comments