राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी यासाठी काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीत थोरात यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा



राज्यातील काही भागात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे,  शेतकरी उद्धवस्थ झाला आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज काँग्रेस मंत्र्यांची बैठक घेऊन नुकसानीचा आढावा घेतला.  या बैठकीनंतर थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. झालेले नुकसान खूप मोठे असून भरीव मदत मिळावी, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना थोरात म्हणाले की, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील इतर भागातही अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी या भागाचा दौरा केला. काँग्रेसच्या मंत्र्यांनीही या भागाचा दौरा करुन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत. 

विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, सतेज पाटील, डॉ. विश्वजित कदम या मंत्र्यांनी नुकसानीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांबरोबर आपणही या भागाची पाहणी केली होती. काँग्रेसच्या मंत्र्यांनी आज या विषयावर चर्चा केली. झालेले नुकसान खूप मोठे आहे. शेतकऱ्यांशी पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे ही आमची भावना असून जास्तीत जास्त मदत मिळावी ही मंत्र्यांशी भावना असून आपण ती मुख्यमंत्र्यांकडे मांडू  असे थोरात म्हणाले.

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली या भागाचा तीन दिवसांचा दौरा केला होता. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातचा दौरा केला होता. कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनीही सांगली जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, तासगाव या तालुक्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त गावांचा दौरा करत शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. 

तर गृह राज्यमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील दुंडगे, कुदनूर, काळकुंद्री, हुदळेवाडी, किणी, कोवाड आणि निट्टूर या गावातील अतिवृष्टी, वादळीवारे व ढगफुटीमुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. या सर्व मंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. आता यावर चर्चा झाली असून लवकरच मदतीसंदर्भात सरकार निर्णय घेईल असे थोरात म्हणाले.



Comments