दिवाळीच्या फराळाला महागाईची फोडणी
कोरोनामुळे विविध उद्योग, व्यवसाय अडचणीत आल्याने कित्येकांच्या रोजगाारावर परिणाम झाला आहे. आर्थिक झळ सोसत असतानाच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या भरमसाठ वाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे पुरते मोडले आहे. दिवाळीचा सण तोंडावर असतानाच सर्वसामान्यांना महागाईची फोडणी बसली आहे.
कोरोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने खासगी आस्थापनातील कित्येकांना नोकरी, रोजगार गमवावे लागले. गेल्या दोन महिन्यांपासून उद्योग, व्यवसाय हळूहळू सुरू झाले असले तरी नोकरी मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्यातच अतिवृष्टीमुळे तयार पिकांचे नुकसान झाल्याने येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच अचानक खाद्यतेल, डाळी, कडधान्य यांच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट पुरते कोलमडले आहे.
खाद्यतेलाची किंमतही गेल्या महिन्याच्या तुलनेत १५ ते २० रूपयांनी वाढली आहे. डाळींच्या किमतीत १० ते १५ रूपये, कडधान्यांच्या किमतीत १२ ते १५ रूपयांनी वाढ झाली आहे. जूनपासून चहा पावडरचे दर तर किलोमागे ४० ते ५० रूपयांनी वाढले आहेत. कांदा, बटाट्याच्या दराने तर उच्चांक गाठला आहे. दिवाळीच्या फराळासाठी लागणारे साखर, रवा, मैदा, खोबरे यांचे दर मात्र सध्या स्थिर आहेत. कांदा ८५ ते १२० रूपये, बटाटा ५५ ते ८० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. दिवाळीत तेल, डाळींचा वापर सर्वाधिक होत असल्याने नेमकी याचवेळी दरात झालेली वाढ ग्राहकांच्या खिशाला कात्री लावत आहे.

Comments
Post a Comment