नगराध्यक्षा खेराडे यांचा पत वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न महाविकास आघाडीच्या महिला सदस्यांची प्रतिक्रिया


कार्यसम्राट, अभ्यासू, कमालीच्या प्रामाणिक व चिपळूणच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या भाजपच्या कोकणातील एकमेव नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी गेल्या साडेतीन वर्षात अत्यंत चुकीच्या पद्धतीने कामे केली आहेत आणि मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला. आता जिल्हाधिकाऱ्यांकडे बेकायदेशीरपणे केलेल्या १९ विकासकामांबाबतचे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्याने व त्यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव महाविकास आघाडीने सादर केल्याने नगराध्यक्ष सुरेखा खेराडे या कमालीच्या अस्वस्थ झाल्या आहेत व आपले पद आणि आणि उरलेली पत, प्रतिष्ठा जाणार असल्याने प्रचंड घाबरल्या आहेत. 

त्यामुळे आता महिला आयोगाकडे जायचं, जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी पूर्ण होण्यापूर्वीच उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करायची, असे त्यांचे केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत, मात्र ज्या लोकांनी अत्यंत विश्वासाने एक प्रामाणिक महिला म्हणून त्यांना नगराध्यक्ष केले, त्या चिपळूणवासियांचा त्यांनी अपेक्षाभंग केला. त्यामुळे त्यांना याची शिक्षा मिळणारच, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या सर्व महिलांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी गैरव्यवहार करायचा आणि पुराव्यासह आम्ही त्याची तक्रार दाखल केली म्हणून तक्रारदारांची बदनामी करायची, हे काम आता सुरू केले आहे. 

नगराध्यक्षा खेराडे ह्या अत्यंत खोटारड्या आहेत, हे चिपळूणच्या जनतेला आता कळले आहे. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी असा नेमका त्यांना कसला मानसिक त्रास दिला, तसेच बडतर्फीची मागणी केल्यानंतरच त्यांना आपल्याला मानसिक त्रास होत आहे, याचा साक्षात्कार कसा झाला, असे विचारून साडेचार कोटी रुपयांचे बेकायदेशीर काम केले, याचा जाब विचारला म्हणून कोंडल्याची, विनयभंगाची खोटी तक्रार करणाऱ्या खेराडेंच्या बोलण्यावर सुसंस्कृत व सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या चिपळूणमधील लोक विश्वास ठेवणार नाहीत. त्यांना कोंडले, विनयभंग केला असेल तर चिंचनाक्यामध्ये त्यांनी त्याचे चित्रीकरण दाखवावे. नगरपालिका कौन्सिल सभागृहात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत.

त्यामुळे नगराध्यक्षांनी आता आपलं पद, नसलेली प्रतिष्ठा व पत वाचवण्याचा प्रयत्न करू नये आणि आपण कितीही चिपळूणचे जनतेला प्रामाणिक आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला तरी यापूर्वी ५८/२ या आपल्या अधिकाराचा गैरवापर केला म्हणून िल्हाधिकार्‍यांनी आपल्यावर ठपका ठेवला होता, याचा निकाल सर्वांसमोर आहेच. त्यामुळे आपण महाविकास आघाडीने मानसिक त्रास दिला हे असलं सांगून चिपळूणच्या जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये, असे महाविकास आघाडीच्या महिला सदस्यांनी नमूद केले आहे. आता नगराध्यक्षपद आणि उरलेली प्रतिष्ठा परत जाणार असल्याने मोठ्या मोठ्या नेत्यांच्या, नागरिकांच्या भेटी घेण्याचे त्यांनी सुरू केले आहे. 

तसेच महिला आयोग उच्च न्यायालय या ठिकाणी धाव घेतली आहे, हे न कळण्याइत चिपळूणची जनता सूज्ञ आहे, असे यात नमूद करण्यात आले आहे. नगराध्यक्षांना स्वतः चार वाक्यात आपली बाजू मांडता येत नाही, त्यांना भाजपची कार्यकारणी, खातू, चितळे अशी मंडळी वकील म्हणून लागतात, हेपण जनतेने ओळखले आहे, असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर सई चव्हाण, सुषमा कासेकर, स्वाती दांडेकर, संजीवनी घेवडेकर, सुरय्या फकीर, सफा गोठे, वर्षा जागुष्टे, फैरोजा मोडक, शिवानी पवार, संजीवनी शिगवण, सीमा रानडे, रश्मी गोखले अशा बारा नगरसेविकांच्या सह्या आहेत.

Comments