म्हसळा तालुक्यातील चिंचोडे गावचं तमाशातील लोकप्रिय शाहिरी व्यक्तिमत्त्व हरपलं
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील ( मु.चिंचोडे पो.पाभरे ) या गावातील एक हुरहून्नरी व्यक्तिमत्त्व धोंडूराम देवजी पोटले गावात/तालुक्यात "शाहिर"या टोपण नावाने सर्वश्रुत असणारे व काव्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या म्हसळा तालुक्यातील लोकप्रिय नवोदित शाहिर म्हणून ख्याती असणाऱ्या कवी/शाहिर उमेश पोटले यांचे वडील यांचं शनिवार दि.०३ ऑक्टोबर २०२० रोजी अल्पशा आजाराने अनंतात विलीन झाले.
कोकणातील लोकप्रिय उत्सव शिमगा ( होळी ) हा सण म्हणजे आनंदाचा व कोकणी परंपरेचा होय.या सणात चिंचोडे गावचे शाहिर धोंडूराम पोटले या उत्सवात गावच्या तमाशा या लोककलेच्या माध्यमातून आपल्या अंगीकृत गुणांनी ही लोककला मोठ्या जोमाने सादरीकरण करत असत.या तमाशा लोककला प्रकारात त्यांचा हेरीचा वाटा असे.गायनातून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या शाहिराने ही लोककला अखंडित जोपासली. गावचा तमाशा उभा राहिला की, शाहिर धोंडूराम पोटले यांच्या पहाडी आवाजा शिवाय कार्यक्रमाला रंग नसे.असा हा आवाज हे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने म्हसळा तालुक्यासह चिंचोडे गाव अगदी सुन्न झाले.
बाप ही आईच असते गर्भ नसलेल्या उदराची,रक्त आटवून घामाचा पैसा शिंपून घरातलं मिठाचं गाडगे रीत न होऊ देणारं* अशा "बाप"या प्रत्येकाच्या जीवन प्रवासातील जणू बाप नावाचा सूर्य..!असणाऱ्या बापाचं महत्व जाणुन,अगदी साधं राहणीमान,शांत प्रेमळ स्वभाव आणि वडिलांच्या पाऊल खुणांवर पाऊल ठेऊन हा शाहिरी वारसा अनं कवित्व करून चिंचोडे गावचं नाव रोशन करणारे स्वर्गीय धोंडूराम पोटले यांचे सुपुत्र कवी/शाहिर उमेश पोटले यांनी मात्र कोकणचा शक्ती-तुरा ( जाखडी नृत्य ) या कलेतून प्रामाणिकपणे जोपासला आहे.
कवी/शाहिर उमेश पोटलेंच्या वडिलांच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हळहळ पसरली.त्यांच्या मूळ गावी मु.चिंचोडे येथे अंत्यसंस्कार वेळी अनेक शाहिर वर्ग व विविध क्षेत्रातील मंडळी व गावचे ग्रामस्थ मोठया संख्येनं उपस्थित होती.त्यांच्या या जाण्याने त्याने शक्ती-तुर्यातील सर्व शाहिरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.शाहिर धोंडूराम पोटले यांच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,एक मुलगी सुना नातवंड असा परिवार आहे.कला क्षेत्रात जीवाचं रान करून गावचार सांस्कृतिक वारसा जपताना आपल्या विविध कला गुणांनी आपलं नाव गावात अजरामर ठेवणाऱ्या या महान शाहिरी कलातपस्वी व्यक्तिमत्वाला विनम्र अभिवादन..!

Comments
Post a Comment