विनापरवाना गुरांची वाहतुक, तिघेजण ताब्यात
चिपळुण ते कोल्हापूरच्या दिशेने विनापरवाना गुरांची वाहतुक करणारी बोलेरो पिकअप गाडी संगमेश्वर पोलीसांनी नाकाबंदीदरम्यान पकडली. ही कारवाई गुरूवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर पोलीसांकडून मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर बसस्थानक नाक्यावर गुरूवारी रात्री नाकाबंदी करण्यात आली होती.
यादरम्यान वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. नाकाबंदीदरम्यान बोलेरो पिकअप गाडीची पोलीसांनी झडती घेतली असता या गाडीत दाटीवाटीने 7 जनावरे कोंबलेली निदर्शनास आली. तसेच चालकाकडे पोलीसांनी विचारणा केली असता महेश तानाजी सावंत (रा. शाहुवाडी, जि. कोल्हापूर ) असे नाव असल्याचे सांगितले. व गुरांच्या वाहतुकप्रकरणी कोणताही परवाना नसल्याचे कबूल केले. यानंतर पोलीसांनी गाडी व गुरांसह महेश सावंत, संदीप तुकाराम गुरव (रा. आरवली, ता. संगमेश्वर ), शरद वसंत कांबळे (रा. आरोळ, शाहुवाडी) या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदयकुमार झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. काँ. बाबू खोंदल, पो. काँ. गणेश बिक्कड, होमगार्ड अमोल मोरे यांनी केली. साखरपा- मुर्शी चेकपोस्टवर गुरूवारी पहाटे साखरपा पोलीसांनी गुरांची अवैधरित्या वाहतुक करणारी गाडी पकडली होती. आता संगमेश्वर येथे गुरांची विनापरवाना वाहतुक करणारी गाडी संगमेश्वर पोलीसांनी पकडल्यामुळे विनापरवाना गुरांच्या वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर संगमेश्वर पोलीसांच्या धडक कारवाईबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments
Post a Comment