राजापूरमधील ७५३१ शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान
कमी दाबाच्या पट्टय़ामुळे पडलेल्या मुसळधार पावसाचा राजापूर तालुक्यातील ७ हजार ५३१ शेतकऱ्यांना फटका बसला असून भातशेतीसह नागली पिकाचे मिळून ११८४.१३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या महिन्याच्या सुरूवातीला तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडला. अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पुराचे पाणी काठावरील भातशेतांमध्ये घुसले. त्यामुळे भातशेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. कृषी विभागासह महसूल आणि पंचायत समितीतर्फे या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले.
त्यानुसार तालुक्यातील २३० गावांमधील ७ हजार ५३१ शेतकऱ्यांना फटका बसल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये भातशेतीला सर्वाधिक तर, त्यानंतर सुपारी पिकाला नुकसानीचा फटका बसला. त्याच्यासोबत नागली पिके, ऊस, तीळ, काजू, कोकम यांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. या नुकसानीचा सविस्तर अहवाल कृषी कार्यालयाने वरिष्ठ कार्यालयाच्या माध्यमातून शासनाकडे पाठविल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्रीमती पाटील यांनी दिली.
दरम्यान, अवकाळी पावसामध्ये शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अवकाळी पावसामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. पण ती प्रत्यक्षात कधी मिळणार, याची आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

Comments
Post a Comment