रत्नागिरीत अनधिकृत खोके दिमाखात उभे


शहरातील मारुती मंदिर येथे एका रात्रीत उभारलेल्या पाच खोक्यांचा विषय सध्या चर्चेत आहे . पालिकेच्या गुरुवारच्या सर्वसाधारण सभेतही तो भाजपच्या विरोधकांनी उचलून धरला . नगराध्यक्षांनी मात्र खोकी कोणी टाकले ते मला माहीत नाही , असे सांगितले . त्याबाबत कोणताच ठोस निर्णय पालिकेने घेतलेला नाही . यामध्ये अनेक दिग्गजांची नावे पुढे येत आहेत . याला आशीर्वाद कोणाचा ? असा सवाल आता उपस्थित होत आहे . 

मारुती मंदिर येथील जुन्या आरटीओ कार्यालयाजवळील अतिक्रमणे यापूर्वी पालिकेने हटविली . तसेच रस्त्याजवळ बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांनाही हटवून पाठीमागे बसविण्यात आले होते . या विषयावरून जोरदार राजकारण झाले . अतिक्रमणे हटविण्यात आली त्याच ठिकाणी अनधिकृतपणे नवीन चार खोके दिमाखात उभारण्यात आले आहेत . हा विषय काही दिवस गाजत आहे ; मात्र त्यावर उघड कोणी बोलत नव्हते . 

सत्ताधाऱ्यांच्या जवळच्यांचा यात हात असल्याची चर्चा आहे . खोके मिळण्यावरून अंतर्गत चढाओढही सुरू आहे . पालिकेच्या आजच्या सभेने त्याला राजकीय वळण लागले . भाजपने हा विषय उचलून धरला तर यापूर्वी हटवण्यात आले होते ते  खोके धारकदेखील या विषयावरून न्यायालयात गेल्याचे समजते . त्यामुळे पालिकेची चांगलीच गोची झाली आहे.

Comments