गुहागर तालुक्यातील काताळे गावाचा सुपुत्र रोहित बारस्कर साकारतोय भिंतीवर हुबेहूब चित्र
कोकण म्हटले की निसर्ग सौंदर्याने नटलेली रत्नाची खाणच ती! पावसाच्या थेंबाने जशी वसुंधरा हर्षित होऊन हिरवा शालू नेसून बळीराजाचे स्वागत करण्यास तयार असते आणि बळीराजा सुद्धा ह्या स्वर्गरूपी काळ्या मातीतून सोनं काढण्यास तयार होतो.अशाच कोकणच्या भूमीत रत्नागिरीच्या खाणीत अनेक कलारूपी रत्ने दररोज जन्मास येऊन अगदी ती नावलौकिक ठरली.असाच एक उमदा चित्रकार गुहागर तालुक्यात प्रत्येयाला येतोय.
रत्नागिरी जिल्हातील गुहागर तालुक्यातील काताळे गावाचा सुपुत्र कु.रोहित महादेव बारस्कर सध्या आपल्या हस्तकला कौशल्याने भिंतीवर अनेक हुबेहूब चित्र रेखाटताना दिसतोय.प्रत्येक व्यक्तीच्या अंगी विविध कलागुण अगदी ठासून भरलेले असतात मात्र त्यांना व्यासपीठ किंवा मार्गदर्शन मिळत नाही.अगदी लहानपणापासून शिक्षणाबरोबर त्याला चित्र काढण्याची आवड होती.कुठेही बसल्या जागी समोर दिसेल ते चित्र आपल्या छोट्याच्या वहीत रेखाटायची सवय होती.!म्हणता म्हणता पुढे हिच सवय त्याचा छंद होऊन गेली आणि बघता बघता तो आपल्या शंभरपानी वहीवरून तीच चित्र भिंतीवर रेखाटू लागला.
अशीच त्याने आपल्या घराच्या भिंतीवर अनेक चित्र काढली आहेत.एखादं चित्र काढल्यानंतर त्यात तो त्या चित्राला ऑइलपेंट रंगाचा वापर करून तो त्या चित्राला जिवंत बनवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतो आहे.घरची परिस्थिती हालाखीची असताना त्याच परिस्थितीत तो आपला छंद जोपासत आहे.आपल्या ह्या परिस्थितीवर मात करून त्याला भविष्यात मोठा चित्रकार होण्याचे त्याचं स्वप्न आहे.सध्या तो अशाच कामाच्या प्रतीक्षेत आहे.या युवा चित्रकाराने भविष्यात एक मोठा चित्रकार बनावं अशी आशा अनेकांना लागून राहिली आहे.रोहितच्या कला-कौशल्याचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

Comments
Post a Comment