सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट पाणी समुद्रात : स्थायी समितीत प्रशासनाविरोधात आगपाखड

 


सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते समुद्रात थेट सोडल्याने झालेल्या प्रदूषणाप्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने मुंबई महापालिकेला ३४ कोटींचा दंड ठोठावल्याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले.पालिकेच्या हलगर्जीपणामुळे एसटीपी प्रकल्प रखडला आणि त्यामुळेच पालिकेवर दंडात्मक कारवाई झाली, असा आरोप सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी प्रशासनावर केला. साधकबाधक चर्चेअंती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, पालिका प्रशासनाने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची कामे टेंडर काढूनही का रखडली आहेत, कोणामुळे रखडली आहेत, कोणाचा दबाव आहे, याबाबतची सविस्तर माहिती लेखी स्वरूपात स्थायी समितीला कळविण्यात यावी, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

याबाबतचा हरकतीचा मुद्दा समाजवादी पक्षाचे गटनेते व आमदार रईस शेख यांनी उपस्थित करीत पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईची सध्याची लोकसंख्या तब्बल दीड कोटीपेक्षाही जास्त आहे. झोपडपट्टी विभागात आजही मलनि: सारण वाहिन्यांचे जाळे टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे मुंबईत निर्माण होणारे सांडपाणी व मलयुक्त पाणी काही प्रमाणातच प्रक्रिया करून समुद्र,खाडीत सोडण्यात येते. त्यामुळे समुद्रातील पाण्यात प्रदूषण निर्माण होऊन समुद्री जीवांना धोका निर्माण झाला आहे. याची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला मागील वेळी दंडात्मक कारवाईचा बडगा दाखवला होता. तर आता राष्ट्रीय हरित लवादानेही या प्रदूषणाची गंभीर दखल घेऊन पालिकेला ३४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या गंभीर घटनेवरून स्थायी समितीवरील सर्वपक्षीय गटनेते व नगरसेवकांनी पालिका प्रशासनाला चांगलेच फैलावर घेत जाब विचारला.महापालिकेतर्फे मुंबईकरांना दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यापैकी सुमारे २७०० दशलक्ष लिटर पाणी सांडपाण्याच्या रूपाने समुद्राला जाऊन मिळते. त्यापैकी काही प्रमाणात सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी समुद्रात, खाडीत सोडण्यात येते. तर उर्वरित पाणी प्रक्रिया न करता तसेच थेट समुद्रात सोडले जाते. त्यामुळे समुद्रात प्रदूषण होते. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय हरित लवादाने ३४ कोटींचा दंड पालिकेला ठोठावला आहे.या विषयावर सपाचे आमदार व पालिका गटनेते रईस शेख यांनी हरकतीचा मुद्दा घेऊन चर्चा घडवून आणली.

मुंबई महापालिकेकडे विकास कामांसाठी तब्बल ५५ हजार कोटींचा निधी असूनही एसटीपी प्रकल्प रखडलाच कसा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, मुंबईत ३० टक्के मलयुक्त वाहिन्या जोडलेल्या नाहीत, असे सांगत पालिकेच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी, मलयुक्त पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी हाती घेण्यात येणारे प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावेत अन्यथा पुन्हा एकदा पालिकेवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे सांगत पालिकेला चांगलेच फैलावर घेतले.तसेच, मुंबईच्या महापौरांनी याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करावा, अशी सूचना रवी राजा यांनी केली.भाजपचे नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी, मुंबईत ८० ठिकाणी प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यात येते, अशी माहिती देत प्रशासनाला फैलावर घेतले.

Comments