प्रकाश गुरवांनी केली प्रकाश कुवळेकरांच्या यांच्या हकालपट्टीची मागणी

 


राजापूर पंचायत समिती सभापती, उपसभापतींपर्यंतची सर्व पदे ज्यांनी मिळवून दिली त्याच प्रकाश कुवळेकरांच्या यांच्या हकालपट्टीची मागणी प्रकाश गुरवांनी केली आहे.राजापूर शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्या विरोधात  सभापती प्रकाश गुरव यांनी दंड थोपटले आहेत. तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर हे संघटनेत गटबाजी निर्माण करत असून प्रमाणिकपणे काम करणाऱ्या पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम करत आहेत. 

तर पंचायत समितीच्या कारभारात नाहक ढवळाढवळ करून मनमानी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पक्ष संघटनेला बाधा निर्माण करण्याचे काम करणाऱ्या तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर यांची तालुका प्रमुख पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी गुरव यांनी केली आहे.

पंचायत समितीच्या अखत्यारित असलेल्या पशुवैद्यकिय विभागाच्या भु येथील पशुवैद्यकिय दवाखान्याचे उद्घाटन करताना सभापती म्हणून आपणाला व प्रशासनाला विश्वासात घेऊन ते करणे आवश्यक असताना मनमानी करत कुवळेकर यांनी बुधवारी या दवाखान्याचे उद्घाटन केले आहे. या प्रकरणी आपण पक्षश्रेष्ठींकडे तसेच उद्घाटन प्रसंगी योग्य प्रकारे सोशल डिस्टंड न पाळल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडेत तक्रार करणार असल्याचे गुरव यांनी सांगितले. अशा प्रकारे त्यांनी अनधिकृतपणे कुवळेकर यांनी या दवाखान्याचे उद्घाटन केल्याचे त्यांनी सांगितले.

गुरूवारी पत्रकार परिषदेत गुरव यांनी कुवळेकर यांच्या मनमानी कारभाराचा पंचनामा केला आहे. गेली दहा ते बारा वर्षें तालुका प्रमुख पदाला चिकटून बसलेल्या कुवळेकर यांनी किती पक्षसंघटना वाढविली असा खडा सवाल करून पक्षसंघटना वाढविण्याऐवजी पक्षात गटबाजी निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गुरव यांनी केला. 

आपणाला सभापती पद मिळू नये यासाठी कायम प्रयत्न केले. तर यावेळी देखील प्रारंभी सभापतींचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा व उपसभापतींचा कार्यकाळ अडीज वर्षाचा निश्चित झालेला असताना कुवळेकर यांनी हा निर्णय बदलला आहे. सभापींचा कार्यकाळ नऊ महिन्याचा करताना उपसभापींना सव्वा वर्षे निश्चित केलेली असताना तो देखील त्यांनी नऊ महिन्याचा केला आहे असा आरोपही गुरव यांनी केला आहे.

तर सभापतींनी राजीनामा दिल्यानंतर आपणाकडे सभापती पदाचा प्रभारी पद्भार येऊ नये यासाठीही कुवळेकर यांनी जंगजंग पछाडत सभापती आणि उपसभापतींचा एकत्रित राजीनामा घेण्याचा अट्टाहास धरला होता. यासाठी सभापतींचा राजीनामा पक्षाचा आदेश आलेला असतानाही २१ दिवस पुढे ढकलला. मात्र आमदार राजन साळवी यांनी यात हस्तक्षेप केल्यानंतर केवळ सभापतींचा राजीनामा घेण्यात आला व त्यानंतर सभापती पदाचा पद्भार आपणाकडे आला. आता संघटनेच्या आदेशाप्रमाणे आपण नवीन सभापतींची निवड झाल्यानंतर उपसभापती पदाचा राजीनामा देणार असल्याचे गुरव यांनी सांगितले. 

मात्र पंचायत समितीच्या कारभाराची सारी सुत्रे आपल्या हाती असावीत यासाठी धडपडणाऱ्या कुवळेकर यांना तसे करण्याची संधी आपण लोकप्रतिनिधी असेपर्यंत कधीही देणार नाही, नव्हे त्यांचा पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या कामातील हस्तेक्षेप आपण खपवून घेणार नाही असा ईशारा गुरव यांनी दिला आहे. आमदार, खासदार चांगले काम करत असून त्यांच्यातही गटबाजी निर्माण करून कार्यकर्त्यांना बिथरविण्याचे काम कुवळेकर करत असल्याचा आरोप गुरव यांनी केला आहे.

गेल्या दहा बारा वर्षात कुवळेकर यांनी किती पक्ष वाढविला असा खडा सवाल करून कार्यकर्त्यांच्या कामासाठी पोलीस स्थानक असो वा कोणतेही शासकिय कार्यकाल असो त्या ठिकाणी जाण्यासाठी घाबरणारा असा हा शिवसेनेचा तालुका प्रमुख काय कामचा? असा सवाल गुरव यांनी केला आहे. पक्ष संघटना वाढविण्याऐवजी पक्षातील निष्ठावान आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम कुवळेकर करत आहेत. त्यामुळे त्यांची तालुका प्रमुख पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी आपण शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांसह पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे गुरव यांनी सांगितले.

Comments