येडगेवाडी मार्गावर एसटी बस सुरु करण्याची मागणी
संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते येडगेवाडी मार्गावर एसटी बस सुरु करण्याची मागणी राजिवली ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. तर देवरूख आगारप्रमुख मृदुला जाधव यांनी या मार्गाची नुकतीच पाहणी केली आहे. कोरोनाकाळात सुरु झालेल्या टाळेबंदीत कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तब्बल ८ महीने या मार्गावरील बससेवा बंद ठेवण्यात आली होती.
प्रदिर्घ कालावधी नंतर प्रथमच या मार्गावर एसटी बस सेवा सुरु व्हावी अशी मागणी स्थानिकांची होती. स्थानिकांच्या मागणी लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने पत्राद्वारे मागणी केली आहे. एसटी बस सुरु करण्यापूर्वी देवरुख आगार प्रमुख मृदुला जाधव यांनी राजिवली ग्रामपंचायत उपसरपंच संतोष येडगे यांच्या उपस्थितीत या मार्गाची संयुक्त पाहणी केली. आरवली - येडगेवाडी मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेली झाडे तोडून रस्ता सुस्थितीत ठेवण्याच्या सुचना यावेळी आगार प्रमुख मृदुला जाधव यांनी मांडल्या आहेत.
आरवली ते येडगेवाडी मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेली झाडी साफ करण्यासाठी संतोष येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधत तातडीने काम करण्याची विनंती केली. संतोष येडगे यांच्या विनंतीनुसार दोन दिवसांत रस्त्याबाबत कार्यवाही करणार असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यांनी मशिनरी उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आगार प्रमुखांनी मांडलेल्या सुचनांची पुर्तता झाल्यानंतर एसटी बस सेवा पुर्ववत करणार असल्याचे आगार प्रमुख मृदुला जाधव यांनी सांगितले. आगार प्रमुख मृदुला जाधव यांच्या पाहणी दौऱ्यात उपसरपंच संतोष येडगे, विठ्ठल येडगे, धोंडीबा येडगे, दादू येडगे, बबन येडगे, बाबू येडगे, देवेंद्र येडगे आणि इतर ग्रामस्थ तसेच एसटीचे कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment