रत्नागिरी मेरिटाईम बोर्डाच्या भोंगळ कारभाराचा फटका मि-या, पंधरामाड परिसरातील ग्रामस्थांना सोसावा लागतोय?
रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या व पंधरामाड या परिसरातील समुद्र किनाऱ्याची मोठ्या प्रमाणावर धूप होऊन ग्रामस्थांचे फार मोठे नुकसान होत आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या भोंगळ कारभाराचा फटका या परिसरातील ग्रामस्थांना सोसावा लागत असल्याचे या परिसरातून बोलले जात आहे. राज्याचे बंदर व मत्स्य विकास मंत्री असलम शेख यांनी तात्काळ संबंधित सर्व कामांची चौकशी करून या परिसरातील ग्रामस्थांना सुरक्षा मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात अशी मागणी जनतेची होत आहे.
समुद्राला उधाण आल्यानंतर त्याचे हादरे आजूबाजूच्या घरांना बसतात. त्यामुळे पावसाळ्यात मिऱ्या व पंधरामाड परिसरात भीतीचे वातावरण असते. दरवर्षी या समुद्रकिनाऱ्यालगत मोठ मोठे दगड व टेट्रापॉड्स टाकून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र समुद्राच्या उड्डाणाच्या तडाख्याने या सर्व कामाची दरवर्षी धूप होते. तसेच घरांचे व घरासमोरच्या परिसराचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होते. या नुकसानीची भरपाई अध्यक्ष शासनाकडून झालेली नाही. कायमस्वरूपी धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यासाठी प्रयत्न होत आहे अशी केवळ आश्वासने देण्यात येतात. मात्र प्रत्यक्षात धूप प्रतिबंधक बंधारा होतच नाही. पतन विभागाच्यावतीने काही ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्याची कामे सुरू झाली होती ती अपूर्ण आहेत.
राज्याचे बंदर व मत्स्य विकास मंत्री असलम शेख यांनी या सर्व परिस्थितीचा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड रत्नागिरी कार्यालयाकडून सविस्तर आढावा घ्यावा, तसेच मागील दहा वर्षात झालेल्या कामाचा आढावा व लेखाजोगा घेण्यात यावा, व या परिसरातील ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी जनतेमधून होत आहे.





Comments
Post a Comment